मालवणचे दिवाणी न्यायाधीश माननीय बी.बी.चौहान यांच्याद्वारे शुभारंभ व मार्गदर्शन..
मालवण | वैभव माणगांवकर : प्रत्येक भारतीय नागरीकाला संविधानातील कायद्याचे संपूर्ण ज्ञान प्रत्येकाला असले पाहिजे असे कायद्याला अभिप्रेत आहे. कायद्याच्या अज्ञानाबद्दल कोणलाच माफी नाही. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असून सर्वांपर्यंत कायद्याचे ज्ञान पोहचलेले नाही म्हणूनच सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत कायदा पोहोचावा, कायद्याबाबत जागरूकता व साक्षरता निर्माण व्हावी यासाठी व्यापक अभियान राबविले जात असून गावागावात या अभियानाद्वारे तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत कायद्याचे ज्ञान व न्याय पोहचवूया असे आवाहन मालवणचे दिवाणी न्यायाधीश श्री. बी बी चौहान यांनी विधी साक्षरता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
विधी साक्षरता व विधीविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणने भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत कायदा पोहोचावा, या उद्देशाने २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत विधी साक्षरतेसंबंधी व्यापक अभियान राबविण्यात येत आहे मालवण तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ आज मालवण भरड नाका येथून प्रभात फेरी काढून करण्यात आला. यावेळी भरड दत्त मंदिर येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व भारतीय संविधानाच्या ग्रंथास न्यायाधीश श्री. चौहान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश श्री ए जी नाईक, मालवणचे तहसीलदार अजय पाटणे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, नायब तहसीलदार श्री. आनंद मालवणकर, मालवणचे सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, अधीक्षक श्री बी के देवगडकर,श्री टेमकर, सौ तवटे, आर एस फर्नाडिस, प्रतिधारीत वकील ऍड. अक्षय सामंत, ऍड. अमृता मोंडकर, ऍड. सोनल पालव, ऍड. गिरीश गिरकर, ऍड. सुदर्शन गिरसागर, ऍड. सुमित जाधव, ऍड माधवी बांदेकर,वाहतूक पोलीस गुरू परब, कृषी अधिकारी संजय गोसावी, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री व्ही जी खोत आदी तसेच शालेय विद्यार्थी, शिक्षक व इतर उपस्थित होते.
यावेळी ऍड. अक्षय सामंत यांनी प्रास्ताविक व स्वागत करत विधी साक्षरता अभियानाची माहिती दिली.
तर ऍड. सोनल पालव यांनी विधी साक्षरतेबाबत सर्वांना शपथ दिली.
यावेळी बोलताना न्यायाधीश श्री. चव्हाण म्हणाले, संविधानात सर्वांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय देण्याचे वचन देण्यात आलेले आहे. मात्र आजही अनेक दुर्बल घटकांना न्याय मिळालेला नाही. सर्वांपर्यंत कायद्याचे ज्ञान व न्याय पोहचलेला नाही. म्हणूनच या व्यापक अभियानातून गावागावात कार्यक्रम राबवून प्रत्येक नागरिकापर्यंत कायद्याचे ज्ञान पोहचवून कायद्या विषयी जागरूकता व साक्षरता निर्माण करण्यात येणार आहे. यात सर्वांनी सहकार्य करावे असेही दिवाणी न्यायाधीश श्री चौहान म्हणाले.यानंतर मालवण भरड नाका ते एसटी स्टँड पर्यंत कायदाविषयक जनजागृती फेरी काढण्यात आली.