वैशाली पंडित | उपसंपादक : व्याधिग्रस्त आणि दुर्बल अशा वार्धक्याचे व्यवस्थापन ही एक जीवघेणी समस्या आणि आव्हान सद्यस्थितीत समाजासमोर उभे आहे.अंथरूणावर खिळलेल्या सर्वस्वी परावलंबी ज्येष्ठ नागरिकाच्या शुश्रुषेसाठी आणि स्वच्छतेसाठी जवळचे नातलग वेळ देऊ शकत नाहीत,घरी अशा रूग्णांची देखभाल करणे शक्य नसते. पैसा असला तरी असे रूग्ण केविलवाणे होतात.
या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीचे एक दमदार पाऊल म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेडी येथे श्री.शांताराम प्रभूझांट्ये ट्रस्ट अनुदानित व रेडकर हाॅस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्ट संचलित ‘ विसावा’ या नवीन संकल्पनेचा शुभारंभ! हा कार्यक्रम रेडी येथे रविवार दि.२२ जानेवारी रोजी होत आहे.
या आधी याच संस्थेद्वारे ‘ दिलासा’ हा ही उपक्रम यशस्वीरित्या सुरू असून अनेक रूग्णांनी याचा लाभ घेतला आहे.
विसावा या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष पुरवले जाणार आहे.आयुष्याचा उत्चरार्ध कसातरी ढकलण्यापेक्षा उरलेले आयुष्य जास्तीत जास्त स्वस्थपणाने जगायला मदत करता येईल असा आशावाद डाॅ.विवेक रेडकर यांनी व्यक्त केला आहे.
‘विसावा’ या उपक्रमाचा सामाजिक आरोग्यवर्धनासाठीही उपयोग होणार आहे.निसर्ग संवर्धन,वैद्यकीय पर्यटन प्रकल्प,कर्करोग जाणीव जागृती आणि तांत्रिक सुविधा,मधुमेहावरील आधुनिक उपचार, बालकांचे आरोग्य यासारख्या अत्यावश्यक बाबींचा पाठपुरावा करणे शक्य होणार आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मान.श्री.सुरेश प्रभू यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुण्या मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्ष सौ.उमा प्रभू असतील.
गोव्याचे आमदार मान.डाॅ. चंद्रकांत शेट्ये , दिलासा उपक्रमाचे युवा पाठीराखे श्री.विशाल परब आणि रेडी गावचे सरपंच श्री.रामसिंग ऊर्फ भाई राणे यांचीही विशेष उपस्थिती आहे.
डाॅ. विवेक रेडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला आणि समाजाला अनेक वैद्यकीय बाऊ आणि गैरसमजां पलिकडे पूर्वीच नेऊन ठेवले होते. आता ‘विसावा’ मार्फत आशावाद आणि आशिर्वाद या दोन तत्वांची नव्याने ओळख करुन देण्याचे एक सामाजीक कार्यही त्यांनी आपल्या रिसर्च सेंटर मार्फत करुन दाखवले आहे.
स्वतः डाॅ.विवेक रेडकर यांनी समस्त सिंधुदुर्ग वासियांना या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रितही केले आहे.