मसुरे | प्रतिनिधी : मुंबई गिरगांव साहित्य संघात आयोजित करण्यात आलेल्या एकता कल्चरल अकादमीच्या चित्रपट- नाटक आणि साहित्य वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात कलमठ येथील कवी किशोर कदम यांना राज्यस्तरीय काव्य स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले. सदर पारितोषिक ‘डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला” या लोकप्रिय गाण्याचे गायक तथा अभिनेते नागेश मोर्वेकर, सुप्रसिद्ध कवी अजय कांडर आणि ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते कवी कदम यांना प्रदान करण्यात आले.
मुंबई एकता कल्चर अकादमी सुमारे ३५ वर्षे चित्रपट -नाटक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविते. या निमित्ताने राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या राज्यस्तरीय सदर स्पर्धेत कवी किशोर कदम यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते. ते पारितोषिक वरील मान्यवरांच्या हस्ते देऊन कवी किशोर कदम यांना गौरविण्यात आले.
किशोर कदम हे ओसरगांव येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दर्पण सांस्कृतिक मंचचे ते अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत त्यांनी कार्यरत राहताना सहृदयतेने इतरांना सहकार्य केले. कवी म्हणूनही त्यांनी लक्षवेधी काव्य लेखन केले असून या राज्यस्तरीय पारितोषिकबद्दल त्यांचे सिंधुदुर्गच्या साहित्य क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.