श्रावण | गणेश चव्हाण : रस्त्यांवरील आणि विशेष करुन महामार्गावरील अपघात टळावेत, कमी व्हावेत, वाहनधारकांनी व जनतेने रस्ता सुरक्षेचे नियम पाळावेत, यासाठी कुडाळ येथे आज १५ जानेवारीला जनजागृतीच्या अंतर्गत वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ शहरामध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत ६ किलोमीटर वॉकेथॉनचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने व रोटरी क्लब, कुडाळ, लायन्स क्लब कुडाळ व गिअर अप जिम कुडाळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या हस्ते फित कापून व हिरवा झेंडा दाखवून, आर.एस.एन. हॉटेल चौकातून वॉकेथॉनचा शुभारंभ केला. यावेळी उ.प्रा.परीवहन अधिकारी नंदकिशोर काळे म्हणाले, सध्या रस्त्यावर होणारे अपघातात मोठी वाढ झाली आहे. यात रस्त्याने चालणाऱ्या पादचाऱ्यांना, वाहनांद्वारे धडक होण्याचे प्रमाणही फार वाढले आहे. यामुळे अनेकांचा नाहक बळी जातो. हे अपघात होऊ नयेत, यासाठी रस्त्यावर चालताना डाव्या बाजूने चालण्याने मागील वाहन दिसत नाही व अपघात होतात. त्यामुळे उजव्या बाजूने चालल्यामुळे पुढून येणारे वाहन दिसते व यामुळे अपघात होणार नाहीत. त्यामुळे लोकांनी चालताना उजव्या बाजूने चालावे व वाहन चालकांनीही रस्ता सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन, जनजागृतीने करण्यासाठी या वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही वॉकेथॉन रॅली, कुडाळ येथील आर.एस.एन. हॉटेल पासून सुरु करण्यात आली. त्यानंतर कॉलेज चौक, गवळदेव चौक, पोलीस स्टेशन, एस. टी. स्टॅन्ड, आंबेडकर चौक, गुलमोहर हॉटेल, नवीन बस स्टॅन्ड ते पुन्हा आर.एस.एन. चौक अशी मार्गक्रमित करण्यात आली होती. या रॅलीत शकडो नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये कुडाळ मधील विविध क्षेत्रातील मान्यवर, रोटरी क्लब, लायन्स क्लब चे पदाधिकारी व सदस्य, गिअर अप जिमचे सदस्य, शहर व परिसरातील मोटर ड्रायविंग स्कुल चे प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वॉकेथॉन मध्ये सहभागी सर्व नागरिकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात व सहभागी ज्येष्ठ नागरिकांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.