भरड नाका येथून होणार प्रभातफेरीचा शुभारंभ..
उद्या 2 ऑक्टोबरपासून विधीसाक्षरतेसंबंधी व्यापक अभियान..
मालवण | वैभव माणगांवकर : विधी साक्षरता व विधीविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणने भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत कायदा पोहोचावा, या उद्देशाने २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरपर्यंत विधी साक्षरतेसंबंधी व्यापक अभियान राबविण्याचे योजिले आहे. जिल्हा न्यायाधीश हांडे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव म्हालटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी मालवण भरडनाका येथून प्रभात फेरी काढून होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण देशात साजरे होत आहे. भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय प्रदान करण्याचे वचन दिलेले आहे. मात्र, अजूनही प्रत्यक्षात बऱ्याच लोकांना आपल्या अधिकार व व कर्तव्यांबाबत जाणीव नाही. समाजातील प्रत्येक दुर्बल घटकास मोफत कायदेविषयक सहाय्य देण्याचे शासनाचे कर्तव्य आहे. तसेच ‘न्याय सर्वांसाठी हे विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य आहे. समाजातील महिला वृद्ध, बालके, निरक्षर, मागासवर्गीय व आदिवासी इत्यादी दुर्बल घटकांना कायद्याविषयी साक्षर करण्याचे काम राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणांतर्गत ल राज्य व जिल्हास्तरीय प्राधिकरण आणि तालुकास्तरीय समिती अविरत करत आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत मालवण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये तालुका विधी सेवा समिती तसेच तालुका विधीज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कायदेविषयक शिबिरांचे तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांचा प्रत्येक मालवणवासियांने लाभ घ्यावा असे आवाहन दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती आणि सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर, मालवण यांनी केले आहे.