बाँबे ब्लड ग्रुप रक्तदाते विक्रम यादव यांची रक्तकर्तव्य माणुसकी
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानची मोलाची सामाजीक कामगिरी
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सांगली जिल्ह्यातील तासगावचे सुपुत्र विक्रम विश्रांत यादव यांनी गुरुवार ३० सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत जगातील अत्यंत दुर्मिळ असे बाँबे ब्लड ग्रुप रक्ताचे रक्तदान करत रक्ताचे नाते सिंधुदुर्ग सोबत जोडले आहे.
मालवण तालुक्यातील नांदोस येथिल श्री. राजाराम गोविंद गावडे (वय ६५ वर्षे) यांचे एचबी ४ ग्रॅम होते. तसेच त्यांचे डायलेसीसही चालू आहे. त्याकरिता त्यांना जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या बाँबे ब्लड ग्रुपच्या ४ सदस्यांपैकी एक सुधीर कांबळी यांनी रक्तदान केले होते. रुग्णाला आणखी एका रक्तबॅगची आवश्यकता होती. त्या करिता जिल्ह्यातील अन्य ३ रक्तदाते तब्बेतीच्या कारणाने रक्त देऊ शकत नव्हते. त्यामुळे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सांगली तासगावचे मित्र दुर्मिळ रक्तदाते श्री. विक्रम यादव हे स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले व त्यांनी अत्यंत अमूल्य असे रक्तदान केले.
विक्रम यादव यांचे हे तब्बल ६६ वे रक्तदान आहे. यापुर्वी त्यांनी रांची,उत्तराखंड,झारखंड,विशाखापट्टणम,आग्रा, विजापूर, बेंगलोर,म्हैसूर, रत्नागिरी, कर्नाटकसह दुबई, पाकिस्तान,बांग्लादेश इत्यादी ९ देशात रक्तदान केेले आहे.
विक्रम यादव आपल्या आई वडिल व पत्नीसह गुरुवारी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरीत दाखल झाले. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष महेश राऊळ, सचिव श्री किशोर नाचणोलकर, श्री.पंकज गावडे (बाँबे ब्लड ग्रुप), श्री.सुधीर कांबळी (बाँबे ब्लड ग्रुप),श्रीम.सपना पडवळ (बाँबे ब्लड ग्रुप) इत्यादींनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर जिल्हा रक्तपेढीत त्यांनी आपले अमूल्य रक्तदान केले.यावेळी विक्रम यादव यांच्या या महान रुग्णसेवेबद्दल सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव घुर्ये व डॉ. यादव यांनी पुष्पगुच्छ व शाल घालून त्यांचा सपत्निक सत्कार केला यावेळी विक्रम यांचे आई वडिलही उपस्थित होते.
बाँबे ब्लड ग्रुप हा जगाच्या लोकसंख्येत १० लाख लोकांत फक्त ४ जणांचाच असतो, त्यामुळे तो अत्यंत दुर्मिळ असाच आहे, तरिही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यंत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून व रक्तपेढींच्या सहकार्याने तब्बल ४ रक्तदाते या गटाचे मालवण तालुक्यात सापडले आहेत. तसेच मालवणात या चौघांसह एकूण ८ लोक या रक्तगटाचे सापडले आहेत. आणि जिल्ह्यात एकूण १६ ची नोंद झाली आहे.
पाच वर्षापूर्वी विक्रम यादव यांच्यामुळेच या गटाची माहिती झाली आणि प्रतिष्ठानने हा गट मालवणमध्ये व जिल्ह्यामध्ये शोधण्याचे अभियान सुरु केले आहे, आता पर्यंत ६५ लोकांची या गटासाठी तपासणी करण्यात आली आहे.
आज विक्रम यादव यांनी जिल्ह्यात येऊन रक्तदान केलेच, त्याच बरोबर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.विक्रम यादव यांनी कधीही मदत लागली तर हाक मारा आपण हजर होऊ असे आश्वासन दिले.
नांदोस येथील सोमनाथ माळकर व राजाराम गावडे कुटुंबीयांनी विक्रम यादव यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
विक्रम यादव व कुुटुंबीयांनी मालवण येथे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्य व बाँबे ब्लड ग्रुप रक्तदात्या व मालवण कार्यकारणी सदस्य श्रीमती सपना पडवळ यांच्या घरी पाहुणचार घेत सर्वांचे आभार मानले. विक्रम यादव यांच्या या कृतीने रक्तकर्तव्य आणि माणुसकीचा एक वेगळा आदर्श समाजासमोर आल्याची भावना सर्वांमध्ये व्यक्त होत आहे.