बांदा | राकेश परब : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन मेहनतीने ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बांदा नवभारत संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थी भविष्यात साहित्यिक व्हावेत अशी दूरदृष्टी ठेऊन कार्याध्यक्ष कै. आबासाहेब तोरसकर यांनी कुमार साहित्य संमेलन सुरु केले. त्यांनी विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी प्रेरीत केले. कुमार साहित्य संमेलनातून निश्चितपणे दर्जेदार साहित्यिक निर्माण होतील, असा विश्चास सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.
धी.बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई आयोजित न्यू इंग्लिश स्कूल मडुरा हायस्कूल येथे १४ वे ‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलनावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब बोलत होते. व्यासपीठावर संस्था कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, सचिव कल्पना तोरसकर, संस्था प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, गोवा विश्वविद्यालय कोंकणी भाषा विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हनुमंत चोपडेकर, भारतीय सैन्य दलाचे माजी कॅप्टन शंकर भाई, जि. प. माजी सदस्य उन्नती धुरी, श्वेता कोरगावकर, सावंतवाडी पं. स. माजी सभापती निकिता सावंत, कास सरपंच प्रवीण पंडित, मडुरा पंचक्रोशी विकास समिती अध्यक्ष भिकाजी वालावलकर, सचिव तुकाराम शेटकर, ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, ज्येष्ठ कवित्री चारुता प्रभूदेसाई, विजय सावंत, बाबू घाडीगावकर, गीतांजली सातार्डेकर, अर्चना परब, भिकाजी धुरी, अन्वर खान, माजी मुख्याध्यापक दशरथ घाडी, सदाशिव गवस, रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब उपस्थित होते.
डॉ. हनुमंत चोपडेकर म्हणाले, कुमार साहित्य संमेलन ही संकल्पनाच भन्नाट आहे. संस्थेने सर्जनशील साहित्याचे लावलेले सात्विक रोपटे म्हणजे दिव्यत्वाचा साक्षात्कार घडविणारे साहित्यिक अधिष्ठान आहे. कुमार साहित्यकारांनी वाचन, निरीक्षण व आकलन, सखोल अभ्यास, सुलभ भाषाशैली व स्वानुभवाची कलात्मक अभिव्यक्ती ही पंचसुत्रे लक्षात घेतली पाहिजेत. संमेलनातील काव्यवाचन, कथाकथन, ग्रंथप्रदर्शन सारख्या उपक्रमातून साहित्य यात्रेला नवचैतन्य देईल असा विश्वास श्री चोपडेकर यांनी व्यक्त केला.
संमेलनाध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर म्हणाले, कुमार साहित्य संमेलन सुरु करण्यामागे आबासाहेबांचा व्यापक दृष्टीकोन होता. विद्यार्थी दशेपासूनच स्वयंस्फूर्तीने लिहीण्याची गोडी लागावी असा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
दरम्यान, मडुरा तीठा ते न्यू इंग्लिश स्कूल मडुरा पर्यंत सकाळी ग्रंथ दिंडी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह विद्यार्थी, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मोठा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सावंत भोसले यांनी तर प्रास्ताविक असनिये हायस्कूल मुख्याध्यापक कैलास जाधव यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हनुमंत चोपडेकर यांच्या हस्तलिखित भाषणाचे प्रकाशन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला मडुरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे, मडुरा सोसायटी चेअरमन संतोष परब, संचालक उल्हास परब, प्रकाश गावडे, पाडलोस कृषी तंत्रनिकेतन प्रा. समीर कोलते तसेच श्रीकृष्ण भोगले, आनंद परब, प्रकाश वालावलकर, पिंटो परब, गजानन पंडित, विजय वालावलकर, जीवबा वीर, गौरांग शेलेकर, सुरेश गावडे, बी.बी. देसाई, नितीन नाईक, साक्षी तोरसकर, वैभव नाईक आदी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रानंतर कवी संमेलन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सायंकाळी उशिरा कार्यक्रमाचा समारोप समारंभ थाटात करण्यात आला.