मालवणातील मामा वरेरकर नाट्यगृह परिसरांतील ह्रदयद्रावक घटना..!
मालवण | वैभव माणगांवकर : (विशेष वृत्त ): “है जो लहूं मेरा बेहता चला , देखो जुनून मेरा कहता चला….
ख्वाॅबका था मक़ान वो देखता चला,
बेजुबाॅ कबसे मै रहा , बेगुऩाह सहता मै रहा….”, या शायरीच्या ओळींची एक वेगळी आणि ह्रदयद्रावक प्रचिती मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह परिसरांत आज अनुभवायला मिळाली.
नाट्यगृह गृहपरिसरांत उभी केली गेलेली एक कार प्रवेशद्वारावर झोपलेल्या दोन कुत्र्यांच्या अंगावरुन घालून जाऊनही कारच्या चालकाने तिथे न थांबता व कुठलेच औदार्य न दाखवता तिथून प्रस्थान केले.
त्या दोन कुत्र्यांपैकी एक कुत्रा जागीच गतप्राण झाला तर दुसरा जखमी अवस्थेत निपचीत पडून मृत्युशी झुंज देत आहे.
नाट्यगृह परिसरांतील नागरिकांनी त्या कुत्र्यांची संवेदना जाणत त्यांना पाणी पाजून उठवायचे प्रयत्न केले परंतु एक मृत व दुसरा निपचीत पडलेला कुत्रा कुठल्याच प्रयत्नांना प्रतिसाद देऊ शकले नाहीत.
मालवण शहरांत लाॅकडाऊन काळानंतर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून त्याचा दुचाकीस्वार व पादचार्यांना त्रास होतो हे जरी खरे असले तरिही कुत्र्यांच्या अंगावरुन कार नेऊन, त्यांना चिरडून पसार झालेल्या चालकाबद्दल प्राणीमित्र व इतर संवेदनशील नागरीकांत संताप व्यक्त होत आहे.
मुक्या जनावरांच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक उपाययोजना नगरपरिषद प्रशासनामार्फत करण्यात यावी असेही नागरीकांचे मत आहे.