कोकणातील रस खापरोळी रेसिपीला द्वितीय क्रमांक
मसुरे | प्रतिनिधी : कोकणातील आणि खासकरुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीची भुरळ अख्ख्या जगावर आहेच . आता त्याच खाद्यसंस्कृतीची एक वेगळी मोहोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सौ. आरती कांबळी यांनी राज्यस्तरावर उमटवलेली आहे.
महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्राचे मास्टरशेफ या रेसिपी स्पर्धेत मालवण पंचायत समितीच्या विषयतज्ञ सौ.आरती मकरंद वायंगणकर – कांबळी यांनी पाठविलेल्या रेसिपीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.जागतिक पर्यटन दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील खाद्यसंस्कृतीला आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उददेशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्राचे मास्टरशेफ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पदधतीने आयोजन करण्यात आले होते. आपल्या आवडत्या महाराष्ट्रीयन डिशचा व्हिडिओ रेसिपी ऑनलाईन सबमिट करायची होती.
सिंधुदुर्ग जिल्हयातील मूळ कणकवली कलमठ येथील रहिवासी सौ.आरती मकरंद वायंगणकर – कांबळी यांनी या स्पर्धेत कोकणातील रस खापरोळी रेसिपीचा व्हिडिओ पाठविला होता.महाराष्ट्रातून साधारणपणे एक हजारपेक्षा जास्त रेसिपी व्हिडिओ प्राप्त झाले होते. त्यामध्यें कोकणातील रस खापरोळी या रेसिपचा द्वितीय क्रमांक आला आहे. आरती यांच्या या यशाबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.