स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे संपन्न झाली स्वच्छता सेवेची मोहीम.
मालवण | वैभव माणगांवकर : मालवणातील स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे शाश्वत पर्यटनाच्या संदेशासोबतच शहराच्या सौंदर्याचे आणि आरोग्याचे महत्व पटवून देणारी स्वच्छता सेवा मोहीम राबविण्यात आली. जागतिक पर्यटन दिनानिमित्त मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पर्यटन सप्ताह अंतर्गत आज मालवण बंदर जेटी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापक, विद्यार्थी वर्गासह सेवाभावी संस्था देखील सहभागी झाल्या होत्या.
स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभी प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी सर्वांचे स्वागत केले. या साफसफाई मोहिमेस मालवण रोटरी क्लब अध्यक्ष उमेश सांगोडकर व रोटरी सदस्य, लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष विश्वास गावकर व लायन्स सदस्य तसेच मातृत्व आधार फाउंडेशन संस्थापक संतोष लुडबे व सदस्य, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी आदी व इतर उपस्थित होते.
पर्यटन सप्ताह निमित्त स. का. पाटील महाविद्यालय आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार होती. परंतु हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने ही मोहीम बंदर जेटी येथे राबविण्यात आली. यावेळी बंदर जेटी व किनाऱ्यावरील विविध प्रकारचा कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेचे नियोजन प्रा. एम.आर. खोत यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शेवटी प्रा. सुमेधा नाईक यांनी सर्वांचे आभार मानले.