मुणगे हायस्कुल येथे ‘तिमिरातून तेजाकडे ‘ व्याख्यानमालेचे आयोजन
मसुरे | प्रतिनिधी: विद्यार्थ्यांनी केवळ गुणवंत न बनता प्रज्ञावंत बनून स्पर्धा परीक्षाना सामोरे जाऊन शासकीय सेवेत रुजू व्हावे. सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया आणि अभ्यासक्रमाचे आकलन व्हावे यासाठीच ” तिमिरातून तेजाकडे”व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. असे प्रतिपादन कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमा शुल्क विभाग भारत सरकारचे सत्यवान रेडकर यांनी येथे केले. मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि स्व वीणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेज येथे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्था सचिव विजय बोरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, व्यवस्थापक देवदत्त पुजारे, नंदकुमार बागवे, प्रदीप परुळेकर, मुख्याध्यापक प्रसाद बागवे, प्रणय महाजन आदी उपस्थित होते. विजय बोरकर यांच्या हस्ते रेडकर यांचा संस्था व प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनासाठी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी सत्यवान रेडकर यांनी केले. यावेळी विध्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसाद बागवे यांनी मान्यवर आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.