पंजाब नॅशनल बॅन्केच्या नुकसानधारक ग्राहकांना दिलासा मिळणार..?
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सामान्य भारतीय बॅन्क ग्राहकांची डोकेदुखी ठरलेला तथा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला पुन्हा भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमधील उच्च न्यायालयाने बुधवारी यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला असून त्यानुसार तब्बल १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीची भारतीय तपास यंत्रणांकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपास होणार आहे. अधिकृत भारतीय वृत्तसंस्था आणि लंडनमधील द डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राने यासंदर्भातलं पुष्टी केली आहे.
गेल्या दोन वर्षात नीरव मोदी विविध वृत्तसंस्थांना लंडनच्या बाजारपेठांसह विविध काऊंटीजमध्ये दिसला होता पण तो कुठल्याही वृत्तसंस्थेशी काहीही बोलला नव्हता.
दरम्यान फरार नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी लंडन कोर्टात भारताकडून सातत्याने बाजू मांडली जात होती. याविरोधात नीरव मोदीनं लंडन उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र, आज या याचिकेच्या सुनावणीदरम्यान लंडन कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे नीरव मोदीला ताब्यात घेऊन त्याला भारतात आणण्याचा भारत सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंजाब नॅशनल बॅन्केच्या खातेदारांना आतातरी न्याय मिळेल अशी सामान्य खातेदारांची आशा आहे.
इंग्लंडच्या रस्त्यांवर रुप पालटून फिरत असलेला नीरव मोदी ( संग्राहित छायाचित्र)