संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल चे विज्ञान आणि गणित विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक तथा “कोमसाप” मालवण शाखेचे माजी खजिनदार श्रीनिवास रामचंद्र पंडित ( वय वर्षे ७१ ) यांचे सोमवार दिनांक १७ ऑक्टोबरला सायंकाळी ५.४५ वाजता नाशिक येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्याने निधन झाले. जेष्ठ साहित्यिका वैशाली पंडित यांचे ते पती तर भारतीय वायुसेना अधिकारी अमेय पंडित आणि “आपली सिंधूनगरी न्युज चॅनेल” चे मुख्य संपादक सुयोग पंडित यांचे ते वडील आणि रोझरी इंग्लिश स्कूल च्या शिक्षिका सौ. फिलोमीना पंडित यांचे ते सासरे होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन सूना, एक भाऊ, एक बहिण, दोन नातू असा मोठा परिवार आहे.
श्री पंडित सर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे बीएससी, बीएड पर्यंत चे शिक्षण कोल्हापुरातच झाले. त्यांनी खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र. मफतलाल विद्यालय, मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मध्ये विज्ञान आणि गणित हे विषय शिकवायचे. एस.एस.सी. बोर्डाचे परीक्षक आणि पेपर सेटर म्हणूनही काम पाहिले. गीतगायन हा त्यांचा आवडीचा छंद होता. विद्यार्थ्यांना त्यांनी गीत मंचातील गाण्याची गोडी लावली. कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेचे सलग ९ वर्षे त्यांनी खजिनदार म्हणून चांगल्याप्रकारे काम पाहिले. अतिशय शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय म्हणून “पंडित सर” सुपरिचित होते. प्रामाणिकपणा हा त्यांच्या नसानसात भिनलेला होता.ते अतिशय कुटुंब वत्सल होते.
मुलांमधे ते कायम रमत असत. सरांची सुमधुर आवाजातील “नवीन पाणी, झुळझुळ वाणी…. साने गुरुजींचे एक गीत – “हस रे माझ्या मुला…” आणि अत्यंत खड्या आवाजातील त्यांनी म्हटलेले “अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…” ही गीते आजही त्यांच्या विद्यार्थ्यांना आठवणीत नेतात. पंडित सर ऑफ तासाला मुलांना गाण्याच्या भेंड्या, विनोदी चुटके, बोधपर मनोरंजन कथा, कोडी शिकवायचे. शाळेच्या जेवणाच्या मधल्या सुट्टीत ते मुलांसोबत आवडीने भाजी – चपातीची चव घ्यायचे. त्यांच्या या अकाली जाण्याने शिक्षणक्षेत्रातील एक आदर्श, शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय शिक्षक हरपला.