प्रणय देवदत्त पुजारे / मुणगे : बाप्पा !!! आमचा सगळ्यांचा लाडका बाप्पा…अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आपलासा वाटणारा आमचा बाप्पा!!!
बघता बघता वर्ष सरुन गेलं, गेल्या वर्षी तुला समुद्रात विसर्जित करताना ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ असं म्हणत वर्ष कधी होऊन गेलं हे काही कळलंच नाही. ११ दिवस मखरात आणि वर्षाचे इतर दिवस प्रत्येक भक्ताच्या हॄदयावर आणि मनामनात अधिराज्य गाजवनारा तू, माझा बाप्पा!! आता पुन्हा एकदा तुझ्या आगमनाची , तुझ्या दर्शनाची आणि तुझ्या त्या देखण्या रूपाची ओढ लागलीय.
संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आलं, कित्येक माणसं दगावली, कित्येकांचे आपले त्यांना सोडून गेले, संपूर्ण जगावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला; पण प्रत्येकाच्या मनात ठाम विश्वास होता आणि अजूनही आहे, की माझा बाप्पा जगाला या संकटातून बाहेर काढेल. आजूबाजूला सगळीकडे कोरोनाचा हाहाकार चालू असतानासुद्धा तुझ्या उत्सवासाठी लोकांचा उत्साह किंचितही कमी झाला नव्हता, हो, थोड्या प्रमाणात नियमांची बंधनं होतीच, पण त्याने फरक पडेल तो गणेशभक्त कसला! अगदी त्या नियमांचं पालन करत अनेक मोठमोठ्या मंडळांनी उत्सवामध्ये थोडासा बदल करत जनतेची सेवा केलीच, जनसेवा! आरोग्यसेवा!! आणि तुझ्या उत्सवातून तेच तर साध्य करायचंय…
कोकण!!! कोकणातला गणेशोत्सव म्हणजे प्रत्येक कोकणी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय! पण बाप्पा, आज तुझा हा लाडका कोकणी भक्त कोलमडलाय.. वादळ, महापूराशी झुंज देतोय. महापुर आला, घराघरात पाणी शिरलं, कित्येक संसार वाहून गेले, उद्ध्वस्त झाले; पण तरीही ताठ मानेने आणि आत्मविश्वासाने तो पुन्हा उभा आहे , कारण त्याला माहित आहे की आपला बाप्पा येणार आहे…
बाप्पा, तुझी रुपं तरी किती रे?…कोरोना महामारीत डॉक्टर, नर्सच्या रुपात येऊन रुग्ण वाचवनाराही तूच आणि पोलिसांच्या वेशात ड्यूटी बजावनाराही तूच… महापुरामध्ये लोकांना मदतीचा हात देणाराही तूच आणि अगदी रस्त्यावर उतरून कचरा, गाळ साफ करणाराही तूच…मोठमोठ्या प्रसिद्ध व्यक्तिंचे आराध्यदैवत असणारा दगडुशेठ हलवाई आणि सिद्धिविनायकही तूच आणि अगदी छोट्याशा झोपडीत गरीबांच्या मनोकामना पुरवणारा विघ्नहर्ताही तूच…!!!
पण बाप्पा, खरं सांगू का? आम्हाला बघायचंय तुझं ते रूप….ज्यामध्ये उत्सव तर मोठा आहेच पण त्याहीपेक्षा आगमन किती भव्यदिव्य असू शकतं हे दाखवणारा चिंचपोकळीचा चिंतामणी…अनेक तास रांगा लावून केवळ काही सेकंदांसाठी दर्शन देऊन नवसाला पावणारा लालबागचा राजा…संकटं कितीही मोठी असली तरी त्याहीपेक्षा मोठा माझा बाप्पा आहे हे दाखवणारा गणेशगल्लीचा राजा… भक्तांच्या खांद्यावरुन जाणारा तेजुकायाचा राजा…कमरेवरती हात घेऊन उभा राहणारा काळाचौकीचा महागणपती… भक्तांवर कृपादृष्टी ठेवणारा परळचा राजा…आणि अशी तुझी कित्येक रुपं….
नियमांमध्ये अडकून तुझा उत्सव साजरा करायची सवय नाही रे… तुला पुन्हा एकदा त्याच देखण्या रुपात, त्याच रुबाबात आणि त्याच उत्साहात बघायचंय. ते स्वप्नवत् वाटणारे 11 दिवस, त्याच स्वप्नात जगायचंय, भक्तिरसात न्हावून जायचंय! ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत तल्लीन होऊन नाचायचंय, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत तुझं विसर्जन करुन पुन्हा त्याच उमेदीने तुझी वाट बघायचीय…..
हे सगळं अनुभवायला,,,,येशील ना रे बाप्पा?!?!?!?….
जय श्री गणराय. छान शब्दांकन.