“चल उठ लवकर.तुला न्हायला घालते.खणाचं परकर पोलकं घाल, गळ्यात हिरव्या मण्यांची दूड घाल.” आईनं माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला जागं केलं.
” ऊं… झोपू दे ना गं.काय आहे आज ?” मी पेंगुळल्या आवाजात विचारलं,
” आज नवरात्रातला मंगळवार.आपल्या घरातल्या कुवारणीनं पाच घरी ‘जोगवा’ मागायचा असतो.तू आता नऊ वर्षांची झालीयस ना , तुझा मान आहे तो बरं का !” आईनं अंथरूणाच्या घड्या घालत सांगितलं.
तेव्हापासून मी वयात येईपर्यंत दर नवरात्रीतल्या मंगळवार, शुक्रवारी मी जोगवा मागितला आहे.तो का मागायचा असतो हा प्रश्न माझ्या मनात तेव्हा कधीही उद्भवला नव्हता. आई सांगते म्हणून आणि हा मान असतो असं तिनं सांगितल्यामुळे तर माझी ऐटच वाढलेली.भावाला टुक टुक करून मी हातात जोगव्याचं सुपलं घेई.
त्या लहान्या सुपल्यात आईच आधी घरचा जोगवा घाली.मूठभर तांदूळ आणि पाच पैशांचं नाणं.
मी मग आमच्या चाळीतल्या ठरलेल्या पाच घरी जाऊन
” अंबाबाईचा जोssगवाss”असं मोठ्याने म्हणे.
सुरूवातीला मला केवढं कानकोंडं व्हायला झालं होतं! “ईss हे काय असं दुस-याच्या दारात जाऊन भिक्षा मागायची ? काय म्हणतील लोकं? त्यातलं एक घर तर आमच्या वर्गातल्या अरूण गद्रेचं.त्याला वर्गात मला चिडवायला आयतंच कारण मिळेल.” मी फुरंगटुन आईला म्हटलं होतं.
” काही नाही चिडवणार.कुळाचार आहे आपला तो.गद्रेवहिनींना माहीत आहे सगळं.जा तू.आणि देवाच्या कामाला लाजू नये.उजळ माथ्यानं करावं.” आईनं माझी समजूत घातली होती.
मग हिरव्या परकर पोलक्यातली, हिरवी दूड गळ्यात घातलेली, न्हाल्या केसांची बटवेणी घातलेली परांजप्यांची कुवारीण जोगवा मागायला निघे.
इनामदार आत्याबाई, पवारवहिनी, धुळपआजी, गद्रेकाकू आणि खटावकरमावशी अशा पाच घरी मी बाहेरून जोगवा मागितला की, त्या घरी माझं उत्साहाने स्वागत होई.मला हळदीकुंकू लावून केसात एखादं फूल नाहीतर गजरा माळला जाई.सुपल्यात तांदूळ आणि त्या घराच्या परिस्थितीनुसार पाच, दहा पैसे, चार आणे, आठ आणे मिळत.
घरी आले की आई माझी अलाबला घेई.कशी साजरी दिसते माझी कुवारीण असं म्हणे.
जोगव्यात मिळालेल्या तांदळातले मूठभर दाणे घरातल्या तांदळात मिसळले जात प्रसाद म्हणून.आणि बाकीचे तांदूळ, पैसे मात्र आई देवीच्या मंदिराबाहेरच्या भिक्षेक-यांना देऊन येई.
वयात येऊस्तो मी जोगवा मागितला आहे.नंतर ते रिवाजाप्रमाणे बंदच झालं.
पण —
मोठेपणी अनेकदा ग्रामीण भागातल्या विनाअनुदानीत शाळांमध्ये काम करताना दशक्रोशीत हिंडून देणग्या मागितल्या आहेत,
साहित्यिक वा सामाजिक कार्यक्रमांसाठी दारोदार जाऊन निधी गोळा केला आहे,
गरीब रूग्णांसाठी अर्थसहाय्याची आवाहनं केली आहेत,
दर्जेदार मासिके, पाक्षिकांसाठी वर्गणीदार मिळवले आहेत.
जोगवा मागताना आपण तो देवकार्यासाठी मागतो आहोत याचं भान जागं असणं
‘मागतो’ आहोत– देण्या न देण्याचा निर्णय समोरच्याचा आहे हे मान्य असणं
त्यानं न दिलं म्हणून तो कायमचा काळ्या यादीत न टाकणं
मागतानाचा आपला स्वर विनम्र असणं, याचक म्हणून आलो आहोत याची जाणीव असणं
‘ मी’पणा दाराबाहेर ठेवून प्रवेश करणं
आणि ज्या कामासाठी जोगवा मागत आहोत त्यातला हेतू स्वच्छ पारदर्शी असल्याने कणभरही संकोच वा भीड न बाळगणं…
ही मूल्य माझ्या मनात रूजवणा-या माझ्या आईनं किती सुपल्याभरून विचारधन मला दिलं याची आठवण दर नवरात्रीत येते.कारण’मागण्याच्या’ या सवयीने समाजऋणाला जागण्याचं समाधान मिळालं आहे.आपली तेवढी ऐपत नसूनही गरजूंना मदत करता येते याची प्रचिती घेतली आहे.या हातानं मागायचं आणि त्या हातानं देऊन मोकळं होतानाचं श्रीमंत अध्यात्म अनुभवलं आहे.
ही श्रीमंती मिळण्याचे संस्कार मला कुवारपणात माझ्या आईने मला सुपूर्द केले आहेत.हे ‘मागणं ‘ कुळाचार म्हणून माझ्याकडून करवून घेत तिनं माझ्यातला नागरिक घडवला आहे.
हा कुळाचार कोणी आणि कशासाठी सुरू केला असेल हे आमच्या घराण्यात कोणालाही माहीत नाही.मी माझ्यापरीने अर्थ लावत गेले आहे.ज्या कोणी हे सुरू केलं आणि त्याला ‘कुळाचार’ अशी संज्ञा दिली त्या माझ्या पूर्वजांच्या मनात हाच हेतू असेल का ? असावा कदाचित.कारण गरीब श्रीमंत अशी वर्गवारी आणि जातीची उतरंड असणा-या समाजात ‘ मागण्या’ मागची भावना त्या भूमिकेत जाऊन समजून घेणं, स्वतः त्या याचक पातळीवर उतरणं ही गरज द्रष्टेपणाने ओळखली असावी.म्हणूनच जोगवा मागताना अमुक एका जातीच्या घरीच गेलं पाहिजे हा दंडक नव्हता…की मुंबईच्या मिश्र वस्तीत आईला तो पाळता आला नव्हता ? माहीत नाही,पण तो दंडक असेलच तर शिथील करून आईने तो कुळाचार माझ्याकडून करवून घेतला होता.एका संस्काराचं रूजवण माझ्या मनात झालं होतं.
या संस्कारांमुळेच कुठल्याही याचकांबद्दल तुच्छतेची भावना मनात निर्माण झाली नाही.अगदी रस्त्यावरच्या, मंदिराबाहेरच्या किंवा सिग्नलवरच्या मागणा-या लोकांबद्दलही हेटाळणीची भावना उद्भवली नाही.द्यायला जमलं नाही काही वेळा तर हाडतुड तरी केली जात नाही.
त्या अनाथनाथा अंबाबाईने माझ्या जन्मदात्या आईकडून मला हा आयुष्यभर पुरेल इतका जोगवा घातला आहे.
उदे गंsss आई sss उदे उदे !
लेखिका : सौ. वैशाली पंडित, मालवण. ( क्रिएटीव्ह हेड , आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल )