मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप
उमेश परब / कणकवली : खासदार विनायक राऊत यांचा स्वभाव म्हणजे ‘तुम लढो हम कपडे सांभालते है! असा असून राणे सिंधुदुर्गात असताना मुंबईतून आरोप करायचे आणि आपण कडवट शिवसैनिक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करायचा हे आता शिवसैनिकांच्या लक्षात आले आहे. मुंबईत राहून लढण्याची भाषा करायची मात्र संसदेला सुट्टी असतानाही सिंधुदुर्गात यायचे नाही हे प्रकार खास.राऊत करत असल्याचे शिवसैनिकांना समजले असल्याचा टोला मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.हायवे टोल वसुली कंत्राटासाठी खास. विनायक राऊत यांची ही लाचारी असल्याचा आरोप त्यांनी केला.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते.
माजी आम. परशुराम उपरकर म्हणाले, खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्ले येथे सभेत भाजप आमदारांनी बरोबर केलेल्या दोस्तीमुळे निष्ठावंत शिवसैनिकांची मने दुखावली आहेत. आतापर्यंत राणे कुटुंबीयांविरोधात शिवसैनिक लढले. मात्र खासदारांच्या भूमिकेमुळे उपरे सोडून निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
एकीकडे हायवे टोलनाका टोलवसुली कंत्राट आपल्या मुलाच्या नावे मिळवण्यासाठी खासदार राऊत लाचारी करत आहेत. डीपीडिसी मिटिंगमध्ये कानात बोलणारे आमदार वैभव नाईक स्वतःच्या मतदारसंघात नसल्याचे दिसून आले. तर पालकमंत्री केवळ ऍक्शन लला रिऍक्शन देणार असे तोंडाची वाफ घालवत रत्नागिरीला निघून गेले. केंद्रीयमंत्री राणेंनी तर विमानातून प्रवास करताना खासदार विनायक राऊत यांनी आपली बॅग घेतो म्हटल्याचे जाहीर भाषणात सांगत विनायक राऊत यांची हमाल म्हणून संभावना केली होती. या टीकेला खासदार राऊत प्रत्युत्तर देतील अशी अपेक्षा होती. मात्र खासदार राऊत मूग गिळून गप्प बसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये कुजबुज सुरू आहे असेही उपरकर म्हणाले.
जनआशीर्वाद यात्रेत केंद्रीयमंत्री राणेंना स्व. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाण्यास रोखण्याचा आदेश देणारे खासदार विनायक राऊत हे तुम लढो हम कपडे संभालते है अशाच वृत्तीने शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणारे असल्याचे पुन्हा सिद्ध झाल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला. एकीकडे राणे कुटुंबीयांशी हातमिळवणी करायची आणि दुसरीकडे राणे यांनी मातोश्री विरोधात बोलायचे असा प्रकार होत असल्याचा आरोप करताना यामागे खास. राऊत नसावेत ना? असा आरोपही परशुराम उपरकर यांनी केला.