कोणी रहात नसलेल्या बंद फ्लॅटची होते आहे चोरांकडून रेकी…?
कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील नेहरुनगरमधल्या क्रिस्टल रेसिडेन्सीतील दहा बंद फ्लॅट चोरट्यांनी एकाच रात्री फोडल्याची घटना काल पहाटे घडली. मराठा मंडळाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या इमारतीत ही चोरीची घटना घडताना सतर्क राहण्याचे नागरीकांनी चोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चोरट्यांनी एका फ्लॅटमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम ३२ हजार ५०० रू. सह २ लाख ३२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. इतर नऊ फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. चोरट्यांनी रेकी करून सर्व फ्लॅट फोडले असा अंदाज आहे.
फ्लॅट फोडताना इतर लोक रहात असलेल्या उर्वरित सर्व फ्लॅटच्या दारांना बाहेरून कड्या घातल्या होत्या. या टोळीत चारपेक्षा जास्त चोरटे असून परजिल्ह्यातील चोरट्यांची टोळी असण्याची शक्यता पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर व तपासी पोलिस अधिकारी अनिल हाडळ यांनी व्यक्त केली.
क्रिस्टल रेसिडेन्सी च्या ‘बी’ विंगमध्ये फ्लॅट नं.२०२ मध्ये रहाणाऱ्या रेणुका किरण कात्रुटकर यांच्या फ्लॅटमधील २ लाख ३२ हजार ५०० रूपयाचा ऐवज चोरून नेला. सहा तोळयाच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये एक मंगळसूत्र, एक नेकलेस व कानातील टॉप्सचा या दागिणांचा समावेश होता. तशी फिर्याद रेणुका कात्रुटकर यांनी पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी तत्काळ श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण केले होते. चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. चोरट्यांनी सर्व बंद फ्लॅटचे कडी-कोयंडा तोडुन फ्लॅटमध्ये प्रवेश केला. परंतु एका फ्लॅट व्यतिरिक्त चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. चोरट्यांनी सर्व फ्लॅटमधील साहित्य विखरून टाकले होते. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फ्लॅट ला लक्ष केले यावेळी इमारतीतील लोक गाढ झोपेत होते. परंतु काही फ्लॅटधारकांना फ्लॅट फोडण्याच्या आवाजाने जाग आली. परंतु त्या फ्लॅटना चोरट्यांनी बाहेरून कड्या घातल्याने त्यांना बाहेर पडता येईना. त्यातील आरोही अनिल आचरेकर हिने शहरातील तेलीआळी येथे राहणारा तिचा भाऊ अभिषेक आंब्रे याला कॉल करून चोरीचा घटनेबद्दल सांगितले. अभिषेक तातडीने त्याठिकाणी पोहचला. तिथे त्याला तोडफोडीचा आवाज आला म्हणून त्याने कोण आहे अशी विचारणा केली त्यावेळी त्यांच्यासमोर असणाऱ्या ‘बी’ विंगच्या तिसऱ्या मजल्यावरून चोरट्याने सिमेंटची वीट अभिषेकच्या अंगावर भिरकावली. परंतु तो बचावला त्याचवेळी ‘ए’ विंग चोरट्यांनी तळमजल्यावर येण्याचा प्रयत्न केला. इमारतीमधील लोक आपल्याला पकडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजताच चोरट्यांमध्ये धावपळ अ उडाली. त्यांनी कटावणीचा धाक दाखवून तिथून – इमारतीच्या मागील बाजुच्या चिरेबंदी कंपाऊंडवरुन उडी टाकुन पसार झाले. चोरटे पळत असताना पोलिसांची गाडी दाखल झाली, परंतु चोरटे तोपर्यंत पळून जाण्यात यशस्वी झाले.
चोरट्यांनी पळून जाण्यासाठी त्या इमारतीतील रहिवाशांच्या दोन दुचाकी चोरण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी चोरट्यांनी प्रसाद जाधव व अन्य एकाच्या गाडीचे हॅण्डल लॉक तोडले आणि गाड्यांच्या स्वीचच्या वायर्स तोडुन स ‘डायरेक्ट स्टार्ट’ करण्यासाठी गाड्या सज्ज करून ठेवल्या घे होत्या. परंतु रहिवाशांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्याने चोरट्यांचा गाड्या चोरण्याचा डाव फसला.
चोरीच्या घटनेची खबर मिळताच डिवायएसपी विनोद कांबळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, अनिल हाडळ, महिला पोलिस उपनिरीक्षक एस. एस. बंगडे, एल सी पी चे संदिप भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.