( रक्षाबंधन विशेष )
संतोष साळसकर / ब्युरोचीफ : आज रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा हिंदू धर्मातील पवित्र सण. बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा… विश्वासाचा… स्नेहाचा…पवित्र नात्याचा सण…रक्षाबंधन. पूर्वापार चालत आलेल्या या अत्यंत पवित्र सणाला बहीण-भाऊ जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी एकत्र येऊन कौटुंबिक जिव्हाळ्याने साजरा करतात.
लहानपणी बहीण-भाऊ एकमेकांच्या खोड्या काढतात, एकमेकांवर रागावतात, भांडतात, रुसवे फुगवे करतात. पण आपली बहीण मोठी झाल्यावर तिचे लग्न होऊन ती सासरी जाते तेव्हा भावाच्या डोळ्यात अलगद अश्रू येतात. तर बहीण भावाच्या कुशीत बिलगून ओक्साबोक्शी रडते. बहीण सासरी संसारात कितीही रमली तरी ती आपल्या आईवडिलांना, भावाला कधीच विसरत नाही. ती न चुकता रक्षाबंधनाला भावाच्या घरी येऊन त्याला राखी बांधते. तर भाऊबीजेला भाऊ कितीही कामात मग्न असला तरी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भाऊबीज करतो.
आई नंतर निःस्वार्थीपणाने प्रेम, माया, आपुलकी दाखवणारी कोण असेल तर ती बहीणच असते.आणि वडीला नंतर कर कोण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, आपला पाठीराखा असेल तर तो भाऊच असतो. असे हे बहीण – भावाचे अतूट विश्वासाचे, प्रेमाचे, निर्मळ मनाचे पवित्र नाते आहे. जगाच्या पाठीवर याला कुठेच तोड नाही.
रक्षाबंधन आणि भाऊबीज हे बहीण भावांसाठी वर्षातील दोन आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे सण आहेत. रक्षाबंधन दिवशी बहीण भावाच्या मनगटावर रेशीम धाग्याची पवित्र राखी बांधते. त्याला ओवाळणी करून औक्षण करते. गोड खाऊ देते. राखी म्हणजे रक्षण. भाऊ हा नेहमीच आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी तत्पर असतो. तर आपला भाऊ आनंदात रहावा, त्याचा संसार सुखाचा व्हावा,तो कधीच संकटात येऊ नये म्हणून बहीण नेहमीच देवाकडे प्राथना करते.
आपले वीर जवान हे देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करीत असतात. आजच्या रक्षाबंधन दिवशी त्यांना स्वतःच्या बहिणीकडून राखी बांधायला मिळत नाही. तिला भेटायलाही मिळत नाही. अशा वीर जवानांना प्रत्येक गावागावातून भगिनी त्यांच्यासाठी सीमेवर राख्या पाठऊन आपला भाऊ सुरक्षित रहावा यासाठी प्राथना करतात. रक्षाबंधन करण्यासाठी रक्ताचीच नाती पाहिजे अस काही नाही. मानलेली बहिण देखील तेव्हढ्याच पवित्र मनाने, पवित्र नात्याने मानलेल्या भावाला राखी बांधू शकते. एव्हढे हे पवित्र नाते आहे. ज्याला सख्खी बहिण नाही त्याच्या मनाच्या कोपऱ्यात आजच्या दिवशी काय भावना असतील ? काय वेदना असतील ? काय दुःख असेल ते त्यालाच माहीत. बहिणीची माया, ओढ काय असते हे ज्या भावाला स्वतःची बहीण नसते त्याच्या एव्हढ कोणीच सांगू शकत नाही. या प्रसंगातून मीही जात आहे. आज प्रत्येक भावाच्या मनगटावर एकतरी राखी बांधलेली दिसेल. काही भावांच्या मनगटावरील राख्या मोजून संपणार नाहीत. असो.
आजच्या या बहीण -भावाच्या पवित्र रक्षाबंधन सणाला सर्व बहीण भावाना खूप खूप शुभेच्छा. या जगाच्या अंतापर्यंत हे बहीण भावाचे पवित्र नाते असेच अतूट , निःस्वार्थीपने, विश्वासाचे, निर्मळ मनाचे कायम अबाधित राहील.