मालवण | संपादकीय : माझ्या आईची एक कला मला नेहमी अचंबीत करते.आईचा जन्म मुंबईतला व शिक्षणही तिथेच.आईचे गणित,भूमिती अथवा चित्रकलाही तुषार कपूर अभिनय करतो त्याच आवडीची….! म्हणजे खूप हुशारही नाही आणि नापासही नाही पण ओरडून सांगावेत अश्या मार्क ख्यातीचीही नाही..! तरिही ह्या गणित,भूमिती व चित्रकलेची पूर्ण प्राविण्य पावती देणारी एक कला तिच्यात आहे…आणि ती कला म्हणजे जमिन शेणाने सुबक सारवणे..आणि त्यावर रांगोळीचा साज सजवणे..!
आमच्या मालवणच्या देऊळवाड्याच्या ‘जोशी महाल’ ( आम्ही ठेवलेले नांव) या घरी वार्षीक पूर यायचा.व्हाळ दुतडीभरुन वाहून जणू संपूर्ण घर व आवार सॅनिटाईझ करायचा अगदी वार्षिक करार केलेल्या कंत्राटदाराच्या मुकादमासारखा..! एकदा घर पूर्ण साफ करुनच तो जायचा.
नंतरचा एक महिना हा, मॅन व्हर्सेस वाईल्ड सिरीजमधल्या बेअर ग्रील्सच्या दलदल सर्व्हायवल एपीसोडसारखाच असायचा. जमिनीवर पाट , फळ्या असे छोटेमोठे साकव असायचे.ह्या सगळ्याला साधारण एक महिना सहन केल्यानंतर ऑगस्टच्या सुरवातीला एखाद्या रविवारी आई एक बादली व एक घमेलं भरुन शेण मागवून घेत असे. एरवी बर्यापैकी आंतरबाह्य माॅडर्न असणारी आई त्यादिवशी पक्की कोकणस्थ असे.आमच्या घरी एक आक्का नावाची आज्जी तिला दरवेळी,” तू सारवू नको …मी जिती आसय ना…..?”असले लेक्चर देई पण आई तिला शांत करुन स्वतःच सारवण करत असे.सारवताना आई कधीही वाढवण अथवा खराटा वापरत नसे.हातांनीच आणि नखांनीच सारवायला तिला सोपं वाटे.अगदी लहान बाळाला मालिश केल्याच्या फुलहलकेपणे आई सारवायची.साधारण पूर्ण घर म्हणजे सहा खोल्या सारवायला आईला तीन तास लागत असत.मग त्यादिवशी आमचे दुपारचं भोजन हे अरुण भोजनालय, मयूर लाॅज अथवा भरडावर भालचंद्र कृपा भोजनालयांत ठरलेले ही बाबांची आईला ‘सारवण ट्रीट’ असायची.
आज हे सर्व मुद्दाम आठवतेय कारण आज आमच्या वाड्यातल्या श्री देवी सातेरीची म्हणजे मालवणच्या ग्रामदेवतेची वार्षिक श्रावण जत्रा आहे.
श्रावणातील ही जत्रा पूर येऊन गेल्यानंतर अचूक महिन्याने यायची (येते)…आणि जणू आमची ग्रामदेवता देऊळवाडची श्री देवी सातेरी विपरीत व प्रतिकूल स्थितीत वाढलेल्या माझ्या आईने सारवलेल्या व सावरलेल्या घराचाच एक प्रशंसा सोहळा करायची असे वाटते. आईकडे एक सारवण ही असामान्य कलाच आहे असे वाटतंय.वडिलांकडे कधी फरशी घालून घ्या असा तगादा तिने लावला नव्हता.नाही म्हणायला पुढे किचनमध्ये वडिलांनीच स्वतःहून फरशी घालून टाकली पण मुख्य दिवाणखान्याचं कार्पेट होतं आईच्याच हातानं सारवलेलं सारवण.पुरानंतर सावरलेले…,गाईच्या शेणाचे शास्त्रीय महत्व समजलेले…,सारवता सारवता लेखनासाठी आपसुक काहीसे चिंतलेलं व चितारलेले ते आई नखाचे सारवण..!
आजच्याच दिवशी शहरातील लहान मोठ्या व्यक्ती आवर्जून घरी यायच्या. देवी सातेरीच्या दर्शनानंतर परतताना आमच्या घरी कमीतकमी दोन एकशे जणांचे तरी पाय लागत असत. श्री देवी सातेरी मंदिर रस्त्यावरच म्हणजे पापडीला लागूनच घर असल्याने तसा कोणाला वळसा घालून वगैरे यावे लागत नसे पण कधीकधी पापडीवर झुळूझुळू वहाणारे पाणी मात्र असे…पण ते ही थेट सातेरीच्या समोरील सड्यावरुन येणारे..तिच्याच कुशीतले…निर्मळ पाणी…नवीन पाणी..!
नंतर पुढे मे महिन्यापर्यंत ही सारवण शांती प्रक्रिया महिन्यांतून एकदा आई न चुकता करायचीच.आईने सारवलेली सुबकता मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही.प्रत्येक अर्धगोल अगदी छान टोपलीतल्या भाकरीसारखा वाटे.टोपलीतून भाकर्या कशा एकमेकांवर गोडशीस्तीत असतात तशाच.मोजमाप न घेताही आईची प्रत्येक सारवण अर्धगोल फटकारा हा भींतींशी चपखल नतमस्तक होत असे.कुठे कमी नाही…जास्ती नाही…अगदी कोनमापक अर्धगोलासारखी नक्षी.अगदी कंपासपेटी घेऊन काम केल्यासारखं….!..कधी ते शेण उरलं नाही व कधी कमीही पडलं नाही इतकं गणित वजनी प्राविण्य .. आणि एकंदर त्या कॅनव्हासवरची एक वेगळीच शेणचित्रकारी अविस्मरणीयच…!म्हणूनच मला आश्चर्य वाटे ते तिच्या गणित,भूमिती व चित्रकला ह्यांत ऊदासीन असण्याचं…कदाचित् त्याचा थेट वापर तिला पसंद असावा…ती सूत्र,प्रमेय व कसोट्यांपेक्षा त्यांच्या वापरात ती स्काॅलर आहे.
विविध वर्तमानपत्रे, पाक्षिके,साप्ताहीके ,मासिके व दिवाळी अंक असे आमचे श्रीमंत सोशल मिडिया लाईफ तेंव्हा होते .ह्या सर्व वर्तमानपत्रे अथवा मासिकांमध्ये आईचे लिखाण असायचे..आणि गंमत म्हणजे त्यातले कोणी वाचक जर आईला भेटायला आले आणि तोच दिवस आईच्या सारवणाचा असला तर ते वाचकसुद्धा तिच्या ह्या कलेकडे पाहून आश्चर्य व्यक्त करंत…!
“अरे..,ही लेखिका सारवते सुद्धा…?” असा अजब सवाल त्यांच्या चेहर्यावर मी पाहिलाय.एका दिवाळीत तर स्वतः लेखक सुहास शिरवळकर आमच्याकडे चार दिवस आले होते.त्यांनाही ह्या पूर्ण सारवण कार्यक्रमाला लाईव्ह पाहून गंमत येत होती.सुहासकाका तर जगातील सर्वात निर्भय आणि कलात्मक व्यक्तिमत्व….त्यांनी आईला एक बदल म्हणून डाव्या हाताने सारवून बघायची कल्पना सुचवली…डाव्या हाताने सारवल्यानतर तीच सारवण नक्षी गुजराथी वाटू लागली…म्हणजे गुजराथी स्त्रीया जसा साडिचा पदर उलटा घेतात त्या उपमेची….!
सारवण झाल्यानंतर आईचा कार्यक्रम रांगोळीचा असायचा.छान फुलं किंवा वेगळीच नक्षीदार रांगोळी आई काढायची.त्या फुलांमध्ये बोटांनी रंग आच्छादताना आई खूप आनंदी व्हायची.(आज आईची तिच बोटं मोबाईलवर आनंदी असतात..)नंतर गुलबक्षकीच्या फुलांचे देठ विणून दोराविरहीत माळ ती विणायची.देव्हार्याला ती एक माळ अर्पण करायची व दुसरी माळ त्या सारवण रांगोळी भोवती वेटाळायची….जणू त्या शेणाच्या भूमीला केलेलं ते वंदनच…!
आज वयाने मोठे झाल्यावर आईच्या त्या नक्षीदार सारवण विधी समारंभामागची एक वेगळीच भावना लक्षात येते.ते सारवण जेवढं बाह्य किंवा द्वैतातल्या जमिनीच्या तड्यांना लिंपणारं जितके गरजेचे असायचे तितकेच आईचे आईलाही मानसीक लिंपणारं असायचे. संसार तप्तता व शीतलता दोहोंचेही धग सोसून सावरताना मनाला गेलेले आशा अपेक्षांचे तडे ह्या सारवणा दरम्यानच्या चिंतन एकटेपणातून आईचा आत्मा लिंपत असेल. नोकरी व संसाराच्या धकाधकीतून शेण हे केवळ सारवणाचा कच्चा माल न रहाता पुनर्निर्मीतीच्या गुणधर्मांचा ठोस घटक वाटला असेल तिला.सुगंधाची भुक जागृत ठेवण्यासाठी किंवा सुगंधाची ओळख घेण्यासाठी तो शेणाचा कटू पण आरोग्यदायीगंधाचा उपचार जीवन जगण्यासाठी आवश्यक वाटला असेल तिला. थेट जमिनीशी संवाद साधताना येणारा भीडस्तपणा शेणाच्या मध्यस्थीनं करायची कल्पना म्हणजेच आईचा सारवण इव्हेंट असायचा असेही असेल. आणि ह्या शेण वावरातल्या दमणुकीनंतर आईला शीण आलेल्याचं आठवत नाही…उलट एक वेगळीच प्रसन्न कात टाकल्यासारखी आई दिसायची…!
तर अशी माझ्या आईची संसार सावरता नक्षीलेल्या सारवणांची गंमत….!माझी आई निदान नोकरी करे,लिखाण करे किंवा सांस्कृतीक व सामाजीक व्यक्ततेत स्वतःला निर्भिडपणे मांडे.पण काही स्त्रीया ज्या घर एके घर असायच्या त्यासुद्धा सारवणाचं महत्व जपायच्या हे आपल्याला आठवत असेलच.त्यामागेही त्यांचं मन लिंपणं ही भावनाही असू शकते.म्हणूनच कदाचित् बहुतांश स्त्रीया ह्या घरकामात जुंपलेल्या दिसण्यापेक्षा घराच्या व कुटुंबाच्या आत्म्याला लिंपताना दिसतात….! त्या सगळे तडे आणि अदृष्य तरिही भळभळत्या जखमा भरुन काढतात…कुटुंबियांच्या व स्वतःच्याही…आपल्याच सारवण सावरण्यातून…!
श्री देवी सातेरीची जत्रा हा नुसता धार्मिक विधी नसून अशा अनेक मातांच्या सन्मानाचा व त्यांच्या अस्तित्वाची आठवण करुन देणारा एक आनंद आणि ऊर्जेचा सोहळाच आहे हे म्हणणे उचित् ठरेल. श्री देवी जत्रेला येणार्या प्रत्येक माता भगिनीमध्ये गावचा उत्साह टिकविण्यासाठी आवश्यक सामाजिक ऊर्जा आणि बळ ही जत्रा देते. आता श्री देवी सातेरीकडे जाणारे रस्तेही बर्यापैकी सुधारलेत..आसपासच्या मराळवाडा व चव्हाणवाड्यातील घरातील जमिनीही शेणाच्या राहीलेल्या नाहीत. तरिही या पिढीच्या मागील तेथील सर्व पिढ्यांना श्री देवी सातेरी….त्यांच्या आईचे कष्ट…आणि सारवण नक्कीच स्मरणात असेल आणि जर कोणी विसरत असेल तर श्रावणातील ही जत्रा त्याची दरवर्षी उजळणी करुन देत असेलच…..सातेरी मातेच्या कृपेने.
सुयोग पंडित ( मुख्य संपादक,आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल