मुंबई | ब्यूरो न्यूज : जुलै महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याने आर्थिक संकटात सापडलेले एसटी महामंडळाच्या पाच कर्मचाऱ्यांनी गेल्या महिन्याभरात आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे याकरिता एसटी कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना तीन सप्टेंबर पर्यंत वेतन देण्याचे अंतरिम आदेश शुक्रवारी दिले आहेत.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून एसटीचे प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्न बुडाले आहे. उत्पन्नच मिळत नसल्याने दर महिन्याच्या सात तारखेला होणारे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना किमान दहा तारखेपर्यंत मासिक वेतन देण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही, याविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता. यामध्ये तीन सप्टेंबर पर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे अंतरिम आदेश दिला.