मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
सिद्धीविनायक रियल इस्टेट ग्रुपच्या माध्यमातून प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून किशोर रेवडेकर हे सामाजिक बांधिलकी जपतानाच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत असे प्रतिपादन दहिबाव-बागमळा ग्रामपंचायत सरपंच श्रीम. शुभांगी राणे यांनी येथे केले.
सिद्धीविनायक रियल इस्टेट ग्रुपच्या माध्यमातून दहिबाव बागमळा गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप नुकतेच करण्यात आले.यावेळी व्यासपिठावर सिद्धीविनायक रियल इस्टेट मुंबईचे किशोर रेवडेकर, आप्पा गावडे, गणेश टेंबवलकर, माजी पोलिस पाटील दिलीप शेट्ये, धनंजय रुमडे, नरेश नार्वेकर, संतोष माने, विजय घाडी, रमेश खोत, दिनेश खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
सिद्धीविनायक रियल इस्टेट ग्रुपच्या माध्यमातून दहिबाव बागमळा गावातील सर्व प्राथमिक शाळेतील तसेच बाहेरगावी हायस्कूल मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. विद्यार्थ्यांसाठी रेनकोट वहया, स्वाध्यायपुस्तिका, दप्तर आणि इतर शालोपयोगी साहित्याचा यामध्ये समावेश असतो. बागमळा प्रभुवाडी, दळवीवाडी प्राथमिक शाळा, अंगणवाडी आदी ठिकाणी जावून सदर साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ यांनी सिद्धीविनायक रियल इस्टेट आणि संचालकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांचन खोत प्रियांका पाटकर, प्रणाली रुमडे, आदींनी विशेष सहकार्य केले.