महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आग्रही मागणी
मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनामार्फत इयत्ता १ ते ८ च्या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात . त्याच प्रमाणे यावर्षीही दोन महिन्यापूर्वीच सर्व पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर प्राप्त झालेली असुनही ती अद्याप शाळापर्यंत पोहोच केलेली नाही . ही बाब अतिशय गंभीर असुनहीं प्रशासनाने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही . त्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीने नाराजी व्यक्त केली आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद असून शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरु केलेले असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण चालू करण्यात आलेले आहे. त्यामध्ये १ जुलै २०२१ ते १४ ऑगस्टपर्यंत सेतु अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शाळांमधून जुनी पुस्तके वितरीत करण्यात आलेली आहेत. ती विद्यार्थ्यांच्या हाताळणीने जीर्ण झालेले असून ती वापरण्यासाठी सुयोग्य स्थितीत राहिलेली नाहीत. तसेच १५ ऑगस्ट पासून विद्याथ्यांचे त्यांच्या इयत्तेनुसार ऑनलाईन शिक्षण पुन्हा सुरु झालेले आहे. परंतु विद्याथ्याकडे त्यांच्या इयत्तेची पाठ्यपुस्तके नसल्याने शैक्षणिक अध्यापनात अडचणी येत आहेत. कारण ऑनलाईन शिक्षणासाठी सिंधुदुर्गाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना अडचणीचे होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके शाळास्तरावर त्वरित वितरीत करावी,अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने मा. मुख्यकार्यकारी अधिकारी व मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ.)सिंधुदुर्ग यांचेकडे आग्रही मागणी करण्यात आली आहे.