खारेपाटण / प्रतिनिधी : सध्या राज्यातील व कोकणातील राजकीय वादंगाची परिस्थिती तसेच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख रहावी या दृष्टिकोनातून सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आज खारेपाटण चेकपोस्ट तसेच खारेपाटण शहरात पोलिसांच्या वतीने लॉंग मार्च काढण्यात आला. कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस ठाणे येथून पोलीस गाड्याच्या फौज फाट्यासह निघालेला लॉंग मार्च दुपारी ठीक १२.०० वाजता खारेपाटण येथे पोहचला. खारेपाटण बसस्थानक येथून मुबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण चेक पोस्ट येथे सदर लॉंग मार्च नेण्यात आला. यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी खारेपाटण बसस्थानकावर पोलिसांच्या या लाँग मार्च चे स्वागत केले.
कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काढण्यात आलेल्या पोलिसांच्या या लाँग मार्च मध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस प्रमुख उद्धव साबळे हे उपस्थित होते. तर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. ए. मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांचे सहकार्य मिळाले. तसेच या लाँग मार्च मध्ये सिंधुदुर्ग पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट पुणे क्र. १, दंगल नियंत्रण पथक ठाणे व सिंधुदुर्ग आदी सशस्त्र पोलीस व त्यांच्या ७ ते ८ गाड्या उपस्थित होत्या. नागरिकांनी सण उसत्व काळात शांतता पाळण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी यावेळी केले.