दोडामार्ग | प्रतिनिधी : दोडामार्ग तालुक्यातील बरीच गावे ही दुर्गम परिसरात येतात व त्यामुळे येथील ग्रामस्थ हे एस टी बसची निदान एक तरी फेरी सुरू करावी, अशी मागणी वायनगंतड येथील हर्षद नाईक यांनी केली आहे.
तालुक्यातील ग्रामस्थांना सटेली- भेडशी व दोडामार्ग या दोन मुख्य बाजारपेठा आहेत. वर्षभर आतुरतेने वाट पाहणारा गणपतीचा सण अवघ्या पंधरा दिवसांवर आला आहे. बऱ्याच गोष्टी अनलॉक झाल्या आहेत. तसेच बाजारपेठाही खुल्या झाल्या आहेत. मात्र अजूनही एस टी बस सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे गणपती सणाची खरेदी-विक्री करणे सुलभ होण्यासाठी एस टी महामंडळाने दोडामार्ग तालुक्यातील बस फेऱ्या योग्य नियोजन करून तातडीने सुरू कराव्यात. तसेच बस फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करावे व सणासुदीच्या काळात ग्रामस्थांची गैरसोय टाळावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.