विवेक परब |एडिटोरिअल असिस्टंट :
मालवण तालुक्यातील श्रावण या गावात नारायण चव्हाण यांच्या घराच्या कौलांमध्ये एक साप आढळल्याने वन्यजीवमित्र स्वप्निल गोसावी यांना बोलवण्यात आले. तेव्हा तो व्हिटेकर बोवा (Whitekar boa) जातीचा बिनविषारी साप असल्याचे निष्पन्न झाले. हा साप साधारण २ फूट लांब होता.
हा साप चव्हाण यांच्या कौलारू घरातील कोनवाश्यामध्ये एक दिवस होता. बराच वेळ होऊनही साप तेथून न गेल्याने चव्हाण यांनी वन्यजीवमित्र गोसावी यांना बोलवले. गोसावी यांनी या सापाला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.
प्रामुख्याने छोटी झाडीझुडपे असणारा प्रदेश त्याचा अधिवास असतो. उंदीर हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. त्याला इंग्रजीत Whitekar boa असे म्हणतात. हे नाव पद्मश्री पुरस्कारप्राप्त व प्रसिद्ध भारतीय सरीसृपतज्ञ राॅम्युलस व्हिटेकर यांच्या नावावरून ठेवले आहे. हा साप घोणसासारखा दिसत असला तरी तसे नसून तो बिनविषारी अजगराच्या कुळातील आहे. ही प्रजाती सिंधुदुर्गात प्रामुख्याने दक्षिण भागात आढळते तर इतरत्र दुर्मिळ आहे.