मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आधुनिक पद्धतीने भात लागवड करून उत्पादन वाढवावे असे आवाहन तालुका कृषि अधिकारी श्री. के. के. ढेपे यांनी हिंदळे राणेवाडी येथे शेतीशाळा वर्गामध्ये केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत क्रॉपसप अंतर्गत भात पिक शेतीशाळा महिला शेतकऱ्यांकरिता हिंदळे गावामध्ये राबविली जात आहे. सदर शेतीशाळेमध्ये भात पिकाविषयी पेरणी ते कापणी सर्व मार्गदर्शन निवडक २५ महिला शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमामध्ये हिंदळे येथील शेतकरी सतीश राणे यांचे शेतावर श्री पद्धतीने भात लावणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच कृषि महाविद्यालय मुळदे व किर्लोसच्या कृषिदुत विद्यार्थ्यांनी भात शेतीमध्ये गिरिपुष्पाचा खत वापराचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर तालुका कृषि अधिकारी यांचे हस्ते प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना तूर बियाणे वाटप व महिला शेतकरी यांना परसबागेसाठी भाजीपाला बियाणे कीट वाटप करण्यात आले. यावेळी तालुका कृषि अधिकारी यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी मंडळ कृषि अधिकारी देवगड श्री. पी. बी. भोसले, कृषि पर्यवेक्षक हिंदळे श्री. ए. पी. आपटे, हिंदळे कृषि सहाय्यक श्रीम. व्ही. एस. तिरवडे, कृषिमित्र मिलिंद राणे, शेतकरी ग्रामस्थ व कृषि महाविद्यालय मुळदे व किर्लोस चे कृषिदुत विद्यार्थी उपस्थित होते. आभार बचत गट सी.आर.पी सौ. मानवी राणे यांनी मानले.