लोरे न.१ च्या विकास सोसायटीच्या नूतन इमारतीचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण
कणकवली | उमेश परब : लोरे न.१ या विकास सोसायटीने उत्तम प्रकारे काम केल्यानेच आज त्यांनी स्वमलकीची इमारत उभी केली आहे.भविष्यात या सोसायटीच्या माध्यमातून धोरणात्मक कामे हाती घेतल्याने शेतकऱ्यांचा याचा फायदा होणार आहे. कोरोना कालावधीत विकास सोसायट्यानी चांगले काम केले.त्यामुळे लोरे नं.१ या विविध कार्यकारी सोसायटीला भविष्य उज्वल आहे.लोरे सोसायटीच्या स्वमालकीच्या इमारतीतुन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होतील,असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
लोरे नं १ गावच्या विविध कार्यकारी सोसायटी संस्था इमारतीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी माजी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे,जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे,सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई,पंचायत समिती सभापती मनोज रावराणे,भाजप तालुका अध्यक्ष संतोष कानडे,जिल्हा सरचिटणीस राजन चिके, उपसभापती प्रकाश पारकर,सरपंच अजय रावराणे,रघुनाथ रावराणे, रमेश चव्हाण,सुमन गुरव,अनंत रावराणे, नरेश गुरव आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात विकास सोसायटीजना कर्जाच्या परतफेडीमध्ये सवलत दिली गेली नाही तरीही या सोसायटीजना चांगले मार्गदर्शन होते, म्हणून ही सोसायटी टिकली आहे.
आपल्या इथे साखर कारखाना कसा उभा राहील या साठी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रयत्न करत आहेत.पण त्यावेळी जिल्हा बँकेची मदत हवी असते, पण जिल्हा बँक करत नाही.अजित पवार यांच्या साखर कारखान्याला बँक कर्ज देते, पण जिल्ह्यातील लोकांसाठी कर्जे देत नाही,असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. तुळशीदास रावराणे म्हणाले, १९६२ साली स्थापन झालेल्या या विकास सोसायटीचा टर्न ओव्हर करोडोमध्ये आहे. आपल्या संस्थेला इमारत व्हावी. यासाठी माझा विचार होता त्यामुळे मी प्रयत्न करत गेलो आणि सर्वांच्या सहकार्याने ही इमारत उभी केली.आपल्या सुदैवाने आपले केंद्रीय मंत्री नारायण राणे झाले आहेत, त्यामुळे आपल्याला पुढील काळात सहकार मोठा फायदा होईल.