कोविड रुग्णालयात अनोखे रक्षाबंधन
मुंबई | प्रतिनिधी : बृहमुंबई महानगरपालिकेद्वारे मुलुंड परिसरात उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रुग्णांना कोविड बाधेमुळे आजच्या राखी पौर्णिमेला आपल्या आप्तांना भेटणे शक्य नव्हते.
ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून आज रुग्णालयात राखी पौर्णिमेचा सण आवश्यक ती काळजी घेत साजरा करण्यात आला. या अंतर्गत परिचारिका व डॉक्टर भगिनींनी उपचारासाठी दाखल झालेल्या भावना तर कोविडची बाधा झालेल्या भगिनींना त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भावांना राखी बांधून हा सण साजरा केला. राखी बांधल्यानंतर ओवाळणी म्हणून भावानी आपल्या बहिणींना ‘मास्क’ ची भेट दिली. तसेच घरातील सर्वाना योग्य प्रकारे मास्कचा वापर करण्याचे व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे ‘प्रॉमिस’ केले.