‘विधवा प्रथा बंदी’ निर्णय स्विकारून समाजासमोर ठेवला एक नवा आदर्श..!!
विशेष ग्रामसभेचे आयोजन करून ठराव…!!
नेरूर । देवेंद्र गावडे
मंगळवार। २१ जुन २०२२
शुक्रवार, दिनांक १० जून रोजी नेरूर ग्रामपंचायतीच्यावतीने ‘विधवा प्रथा निर्मुलन-चर्चा व निर्णय’ या विषयांतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
समाजामध्ये स्त्रीयांसाठी यातनादायी असणा-या विधवाप्रथेचे निर्मुलन व्हावे या संदर्भातला विषय चर्चेस घेण्यात आला.
या सभेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. पतीच्या निधनावेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकु पूसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायतील जोडवी काढणे असे विधी केले जातात. त्यामूळे अशा महिलांना फार मानसिक त्रास सहन करावा लागतो.
भारतीय राज्यघटनेनूसार प्रत्येक व्यक्तिला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामूळे या विधवा महिलांनादेखील इतर सर्वसामान्य महिलांप्रमाणे समाजामध्ये सन्मानाने आपले आयुष्य जगता यावे यासाठी हा ‘विधवा प्रथा निर्मुलना’चा निर्णय विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून सर्वानुमते ऐच्छिक स्वरूपात संमत करण्यात आला.
या विशेष ग्रामसभेसाठी नेरूर गावचे सरपंच शेखर गावडे, उपसरपंच समद मुजावर, ग्रामविकास अधिकारी वासुदेव कसालकर, सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या, ग्रामपंचायत सदस्य, नेरूरमधील ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ महिला, बचत गट महिला सदस्या, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका मदतनीस व नेरूर ग्रामस्थ उपस्थित होते.
या विशेष ग्रामसभेसाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.