बांदा | राकेश परब :
पाडलोस मधील कालव्याच्या पुलावरील रस्त्याचे काम करून पंधरा दिवसांचा कालावधी उलटला नाही तोवर रस्ता खराब झाला. रस्ता किमान वर्षभर तरी टिकणे आवश्यक आहे. त्यामुळे अशाप्रकारे शासनाचा निधी वाया जात आहे. सदर काम थांबवून रस्त्याचे पुन्हा खडीकरण व डांबरीकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवासी वर्गातून होत आहे.
बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे कालव्याच्या भागावरील रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खडीकरण व डांबरीकरण दहा दिवसांपूर्वी करण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या पावसाने कामाचा दर्जा उघड झाल्याची चर्चा वाहनचालकांत सुरू आहे. कोणताही अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने दर्जेदार काम करून रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. तसेच लोकप्रतिनिधी व नेतेमंडळी यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अशीही मागणी होत आहे.