नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष यांच्या इशाऱ्यानंतर कणकवलीतील अखेर काम सुरू
कणकवली | उमेश परब : कणकवली शहरात सार्वजनिक बांधकाम कार्यालया लगत साचत असलेल्या पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दोन दिवसापूर्वी यासंदर्भात उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी ठेकेदार कंपनी, महावितरणचे अधिकारी यांना समन्वयाने काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेले दोन दिवस हे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर जवळपास बहुतांशी काम मार्गी लागल्याने या ठिकाणच्या नागरिकांच्या घरामध्ये पावसाळ्याच्या वेळी पाणी शिरण्याची भीती आता कमी झाली आहे. गेली दोन वर्षाहून अधिक काळ हे काम करण्यासाठी सूचना देऊनही महामार्ग ठेकेदार कंपनी टाळाटाळ करत होती. महिन्याभरापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी ठेकेदार कंपनीला निर्वाणीचा इशारा दिला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच हे काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आले. मात्र या पाईप टाकण्याच्या मार्गात महापारेषणच्या ११ केव्हीच्या हायव्होल्टेज लाईन जात असल्याने या ठिकाणी काही भाग पोकलेनद्वारे काम केल्यानंतर उर्वरित भागात मॅन्युअली काम करण्याची गरज होती. यासंदर्भात उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी महामार्ग चौपदरीकरण ठेकेदार कंपनीचे अभियंता अभिजीत पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते, सहाय्यक अभियंता संतोष नलावडे व कनिष्ठ अभियंता कांबळे यांच्याशी समन्वय साधत या सार्याचा ताळमेळ घालून दिला होता. त्यानंतर गेले दोन दिवस हे काम करण्यात आले. आज शुक्रवारी हाय व्होल्टेज लाईनच्या ठिकाणी मॅन्युअली काम हाती घेण्यात आले होते. ज्या ठिकाणी पाणी साचते तेथून हाय होल्टेज लाईन पर्यंत पाईप चे काम पूर्ण करण्यात आले. या लाईन वरुन टाकण्यात येणाऱ्या पाईप साठी मॅन्युअली काम हाती घेण्यात आले असून, लवकरच हे देखील काम मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. आज दिवसभर हाय होल्टेज लाईन च्या ठिकाणी काम सुरू असताना केबल तुटू नये म्हणून कणकवली शहर कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी जातीनिशी उभे राहून हे काम करून घेतले.