परप्रांतीय व्यापारी मुद्यावर ठोस तोडगा न निघाल्याचे सह्यांची मोहीम..!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे व्यापार जगतात खळबळजनक अशी एक घटना समोर येत आहे. नेहमीच तंटामुक्त,एकसंध अशी ओळख असलेल्या व्यापारी महासंघाविरोधात काही स्थानिक व्यापार्यांनी निषेधाचे प्रसिद्धीपत्रक काढत व्यापारी महासंघातून बाहेर पडायचा निर्णय सह्या देऊन जाहीर केला आहे.
व्यापारी महासंघातच सामील असलेल्या काही स्थानिक कटलरी,इलेक्ट्रॉनिक व स्टेशनरी व्यापार्यांनी परप्रांतीय कटलरी व स्टेशनरी व्यापार्याच्या वाढीव अशा दुसर्या दुकानाबद्दल आक्षेप घेत व्यापारी महासंघाकडे तक्रार केली होती.
त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठकही घेण्यात आली. तरिही त्यावर स्थानिक व्यापार्यांना गाफील ठेवून परप्रांतीय व्यापार्यालाच छुपी मदत चालू राहील असे एकंदर वातावरण दिसत असल्याचा आरोप करत व्यापारी महासंघातील काही स्थानिक कटलरी,स्टेशनरी,इलेक्ट्रॉनिक,मोबाईल विक्री व दुरुस्ती व्यापार्यांनी व्यापारी महासंघाशी फारकत घेत असल्याचे एका प्रसिद्धीपत्राद्वारे माध्यमांना कळविले आहे.
परप्रांतीय व्यापार्यांच्या बाबतीत व्यापारी महासंघ जे उदार धोरण दाखवत आहे ते चुकीचे असून त्याने स्थानिक व्यापारी संपण्याचीही भीती या प्रसिद्धीपत्राद्वारे देण्यात आली आहे .
या प्रसिद्धी पत्रात व्यापारी महासंघाची धोरणे त्यांचा खरा चेहरा दाखवत असल्याचे कारण सांगत या काही व्यापार्यांनी व्यापारी महासंघाचा निषेध करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
जवळपास तेहत्तीस व्यापार्यांनी या प्रसिद्धीपत्रावर सह्या केलेल्या असल्याने एक मोठी व पारंपारिक वैभवशाली अशी ओळख असलेल्या बाजारपेठे मधील व्यापारीवर्गात उभी फूट पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
आजपर्यंत व्यापारी महासंघाने स्थानिक व्यापार्यांच्या एकीसाठी व अस्मितेसाठी एकजूट ठेवायचे धोरण राखलेले असल्याने या प्रसिद्धीपत्रानंतर व्यापारी महासंघ कोणती भूमिका घेणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.