मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथिल प्रसिद्ध कवी आणि आंतरराष्ट्रीय व्याख्याते श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘ यशाचं गुपित काय?’ या प्रेरणादायी पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या हस्ते झाले.
प्रसाद कुलकर्णी हे मुंबई पोलीस, निमलष्करी दले, विविध सरकारी विभाग, कॉर्पोरेट कंपन्या, बँका, महाविद्यालये, शिक्षण संस्था आदि ठिकाणी सकारात्मक मनोवृत्ती, व्यक्तिमत्त्व विकास, स्ट्रेस मॅनेजमेंट इत्यादी विषयांवर कार्यक्रम करतात. यशाचं गुपित काय हे त्यांचे आठवे पुस्तक असून त्यांची याआधीची पुस्तके देखील वाचकप्रिय ठरली आहेत.
याशिवाय कवी आणि गीतकार म्हणून अनेक चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांकरता त्यांनी गीतलेखन केले आहे. उषा मंगेशकर, श्रेया घोषाल, साधना सरगम, शान, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आदि अनेक मान्यवर गायकांचा आवाज त्यांच्या गीतांना लाभला आहे.
श्री.राज ठाकरे यांनी या प्रसंगी प्रसाद कुलकर्णी यांच्या विविध प्रेरणादायी उपक्रमांची माहिती घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.