कणकवली | उमेश परब सिंधुदुर्ग ब्युरोचीफ (विशेष वृत्त) : कुठल्याही कलावंताचे बहुतांश जीवन हे रंगभूमी किंवा पडद्यावर लोकांसाठी वेचलेले असते. प्रत्यक्ष काम करताना तो कलेचा सेवक इतकीच त्याची निष्ठा ठेवून जनमानसाला काही मनोरंजक सुखाचे क्षण देऊन त्यांच्या आयुष्यातील थकवा दूर करायचे अथक प्रयत्न करतो. हे करताना तोही थकत असतोच आणि या प्रवासामध्ये तो जर लोककलावंत असेल तर तो आर्थिकदृष्ट्याही तितकासा मजबूत बनतोच असे नाही…..आणि तो त्याचा मूळ उद्देशच नसतो. अशातच लोककलेला वाहून घेतलेला अथक कलासेवक जर अकाली जग सोडून गेला तर त्याच्या चाहत्यांना शोक अनावर होतोच होतो परंतु त्याच्या कुटुंबाची जी हानी होते ती दुःखाच्या कढांमध्ये सर्वसामान्य समाजाला दिसून येतेच असे नाही. जो लोककलावंत अकाली हे जग सोडून जातो त्याला त्याने भविष्याची आर्थिक बेगमी करायची झोळीच कधी कोणासमोर पसरलेली नसते किंवा भविष्य सुकर करण्यासाठी त्याने कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीचे प्लानस् आखलेले नसतात. तो फक्त लोक….रंजन….तालिम….आणि रंगदेवतेत त्याचा आत्मा गुंतवून असतो. त्याच्या पश्चात त्याचे कुटुंबंही त्यांची आर्थिक कुचंबणा कोणासमोर कधी मांडत नाहितच कारण ते असतात ‘लोकराजाचे कुटुंबिय…..स्वाभिमानी व कलाभिमानी..!’ महाराष्ट्राने नुकताच असा एक लोककलावंत राजा अकाली गमावला तो नटसम्राट कै.सुधीर कलिंगण यांच्या जाण्याने…! या राजाच्या कुटुंबियांची वेदना जनमानसात तत्काळ पोहोचलीच परंतु त्याच्या जाण्याची ‘संवेदना’ पोचली ती कोकणातील शिवसेनेला,शिवसैनिकांना आणि पक्षाच्या पदाधिकार्यांना. हा राजा सर्वांचा कलेचा एक कुटुंबसदस्य होता हे जाणून कोकणातील शिवसेनेतर्फे त्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचा अशी संवेदना मदतीची कृतज्ञता फुंकर घातली गेली. रंगमंचावर विविध दागिन्यांनी नटलेल्या लोकराजाचा वैयक्तिक दागिना असतो तो त्याचे कुटुंब…..! आणि तोच दागिना यथाशक्ती जपायचा एक तत्काळ प्रयत्न कोकणातील शिवसेनेने केला.
दशावतार कला ही कोकणची परंपरा आहे सोबतच मराठी मनाची शान आहे . नटश्रेष्ठ दशावतारी लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचे अकाली निधन झाल्याने शिवसेना पक्षाचे कोकणचे लोकप्रतिनिधी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, विधानसभेतील शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू, खासदार राहूल शेवाळे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, आमदार रमेश कोरगावकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, भाऊ कोरगावकर यांनी एकत्रित रित्या ५ लाख रु. ची आर्थिक मदत कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
कै. सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुडाळ येथील बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेच्या सभागृहात आज शोकसभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी हि आर्थिक मदत कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली.याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जी. प. सदस्य संजय पडते, संदेश पारकर, सिने अभिनेते दिंगबर नाईक, तहसीलदार अमोल पाठक , कुडाळचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, पंचायत समिती सदस्य अंकुश जाधव, राजन नाईक, बबन बोभाटे, अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष दिनेश गोरे, उपाध्यक्ष समीर तेंडुलकर, देवेंद्र नाईक,राजा सामंत, अनिल हळदीवे, राजू कलिंगण, दशावतारी कलाकार उदय राणे कोनसकर , दादा कोनसकर, आनंद कोनसकर, राधाकृष्ण नाईक, दत्तप्रसाद शेणई, मारुती सावंत आदिंसह सुधीर कलिंगण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै.सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांना सामाजिक सहकार्य भविष्यात होतच राहून शिवसेनेने हे तत्काळ उचललेले संवेदनशील पाऊलही समाजातील लोककलावंतांच्या कुटुंबांसाठी एक आश्वासक पाऊल व समाजासाठी आदर्श ठरेल असाच पक्षभेदरहीत कलेचा सामाजिक विश्वास कोकणातील जनमानसात व्यक्त होत आहे. ‘लोककलावंताचे कुटुंब हाच त्याच्या कलेच्या हुरुपाचा दागिना असतो आणि तो जपणे ही सामाजिक जबाबदारी आहे’, हा एक आदर्श कोकणच्या शिवसेनेने समाजासमोर ठेवला आहे.