बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक काळात महत्त्वाची भूमिका निभावणारे मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर सूर्यकांत नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा सावंतवाडी तालुका अधिकारी योगेश नाईक यांच्याकडे सुपूर्द केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या ऐन तोंडावर राजीनामा दिल्याने सेनेला धक्का बसला आहे. मत परिवर्तन करणारे अशी ओळख समीर नाईक यांची निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात राजीनाम्याची एकच चर्चा सुरू आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचे जवळचे मानले जाणारे समीर नाईक यांनी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांच्या सोबत सर्व निवडणुकांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाडलोस ग्रामपंचायत निवडणुकीत तर आठ विरूध्द शुन्य असे घवघवीत यश मिळविण्यात समीर नाईक यांचा मोठा वाटा आहे. तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेला पाडलोस गावचे एकगठ्ठा मतदान होण्यासाठी विकासात्मक राजकारण केले. आपण आपल्या वैयक्तिक कारणामुळे पक्षाच्या संघटनेस वेळ देऊ शकत नाही असे कारण त्यांनी तालुका अधिकाऱ्यांना दिलेल्या राजीनामा पत्रात दिले आहे. त्यामुळे समीर नाईक भविष्यात कोणत्या पक्षात जातात की राजकीय क्षेत्राबाहेर जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.