शिरगांव-गावठण येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षणतज्ञ हरपल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोक.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील शिरगांव गावठण येथील रहिवासी सेवानिवृत्त अप्परग्रेड मुख्याध्यापक नारायण सदाशिव राणे(९४) यांचे २ फेब्रु. रोजी सायंकाळी ५ :३० वाजल्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
कै.नारायण राणे यांनी सुरवात चिपळूण-गुहागर येथून शिक्षकी सेवेला सुरवात केली होती. ते १९८७ साली देवगड तालुक्यातील म्हावळूनगे-राणेवाडी शाळेतून अप्परग्रेड मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. शिरगांवच्या सामाजिक जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी सहकार आणि शिक्षणक्षेत्रात भरीव अशी कामगिरी केली. अतिशय शिस्तप्रिय आणि हसतमुख स्वभावाचे राणे गुरुजी म्हणून ते दशक्रोशीत प्रसिद्ध होते.पावणाई वाचनालय,हनुमान व्यायामशाळा या संस्थेचे ते संस्थापक होते.शिरगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सलग १० वर्षे उपाध्यक्ष होते.शिरगांव हायस्कूल मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षकपदही त्यांनी भूषविले होते.पावणाई फलोद्यान सोसायटीचे २७ वर्षे अध्यक्ष पावणाई देवस्थान जीर्णोद्धार समिती,हनुमान सेवा मंडळ यांचे त्यांनी सचिवपद भूषविले. ते जि. प. प्राथमिक शाळा शिरगांव क्रमांक १ चे शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ सदस्य होते.
त्यांच्या पश्चात मुलगा,सून,४ विवाहित मुली,जावई, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे. शिरगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष व पावणाई वाचनालयाचे ग्रंथपाल भिकाजी उर्फ बबन राणे यांचे ते वडिल तसेच फणसगांव येथील पत्रकार अनिल राणे यांचे ते सासरे होत. श्री. नारायण सदाशीव राणे यांच्या निधनाने जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे.