शिरगांव | संतोष साळसकर : हिंदुस्तानातील एक जाज्वल्य तेजाभिमानी राजा म्हणून इतिहासात अजरामर नोंद झालेले वीर महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ भव्य पुतळा माझगांव येथील महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण पर्यावरण, पर्यटन तसेच राजशिष्टाचार मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (दिनांक २३ जानेवारी २०२२) सायंकाळी सात वाजता होणार आहे. मुंबईमध्ये ममाझगांव परिसरातील प्रभाग क्रमांक 209 मध्ये हा पुतळा उभारण्यात आला आहे.मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनात 23 एप्रिल 2018 रोजी एक बैठक झाली होती.या बैठकीत महाराणा प्रताप सिंह चौकाचे सुशोभीकरण आणि अश्वारूढ पुतळा उभारणीचे निश्चित झाले होते.त्यानंतर 5 मार्च 2019 रोजी महाराणा प्रताप यांच्या पुतळा उभारणीला मंजुरी मिळाली.
20 फूट उंचीच्या चौथऱ्यावर 16 फूट उंचीचा महाराणा प्रताप यांचा भव्य आणि शानदार पुतळा असून पुतळ्याचे साडेचार टन वजन आहे.पुतळा पूर्णता कास्याने बनविला आहे.तसेच महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आजूबाजूला भिंतीशिल्पे लावण्यात आली आहेत.धुळे येथील शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी हा 16 फूट उंचीचा पुतळा बनविला आहे.
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. असलम शेख, , मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, स्थानिक आमदार श्रीमती यामिनी यशवंत जाधव, तसेच आमदार श्री. सुनील शिंदे, आमदार श्री. राजहंस सिंह, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, विरोधी पक्षनेता श्री. रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक श्री. यशवंत जाधव, ई प्रभाग समिती अध्यक्ष श्री. रमाकांत रहाटे, स्थानिक नगरसेविका श्रीमती सोनम मनोज जामसुतकर, महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.