भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेच्या मागणीवर शिवसेना अत्यंत गंभीर भूमिकेत….!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) :शिवसेना नेते सतीश सावंत यांचे जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचारप्रमुख संतोष परबवरील हल्ल्याच्या गुन्ह्यात भाजपा आमदार नितेश राणेंना अटक करावी, यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून आ. वैभव नाईक, संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, की १८ डिसेंबर रोजी संतोष परबवर झालेल्या हल्ल्याच्या गुन्ह्यात आमदार नितेश राणे, गोट्या सावंत यांचे नाव आरोपींनी हल्ला करताना घेतले होते. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र असल्यामुळे राजकीय दबावाखाली नितेश राणेंना पोलीस अटक करत नाहीत. जिल्हा बँकेचे मतदार असलेले प्रमोद वायंगणकर हे बेपत्ता असल्याची फिर्याद प्रमोद यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्याचाही तपास झालेला नाही. या गुन्ह्यात आ. नितेश राणेंना अटक न झाल्यास शिवसेना एसपी कार्यालायवर मोर्चा काढेल, असा इशाराही आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांनी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याशी चर्चेदरम्यान दिला. यावेळी राजू शेट्ये, प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, शेखर राणे, भास्कर राणे, रुपेश आमडोसकर, भूषण परुळेकर, संदेश पटेल, संजय आग्रे, कन्हैया पारकर, ललित घाडीगावकर, मंगेश सावंत, रिमेश चव्हाण, नीलम पालव, दिव्या साळगावकर आदी उपस्थित होते.