आचरा | अनिकेत पांगे (विशेष वृत्त) : सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या, ‘प्रांजळ धडपड, निःस्वार्थ सामाजिक काम आणि मिळालीच तर संस्थेशी जोडले गेलेल्याची एखादी जाहीर पोचपावती..’, ह्या स्वतःकडून तीन माफक अपेक्षा असू शकतात.
एखादे क्षेत्र आवडते आणि नंतर त्या क्षेत्राची ओळख करुन देणारी व्यक्ती त्या क्षेत्राविषयी भरभरुन समजावत असताना एखादा सामान्य माणुस त्या क्षेत्राशी जोडला जातो. त्यातील बारकावे अनुभवून त्याला आपण त्या क्षेत्रासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो असा स्वविश्वास निर्माण होतो आणि तोच विश्वास ध्यास बनून अक्षरशः श्वासही बनतो. नुसते काम ते संस्थेचे कार्य हा प्रवासही एक विद्यार्थीदशाच असतो. या विद्यार्थीदशेत त्या क्षेत्रात जोडल्या गेलेल्या माणसांसोबतचा अल्प सहवासही खूप काही देऊन जात असतो तेंव्हाच काहीतरी सकारात्मक व सृजनशील असे समाजाला द्यायची बिजे नकळत रोवली जातात. नंतर त्याचे रोपटे वाढत जाते…पण रोज नारायणाच्या दिशेनेच..!
मग एक दिवस त्या कार्याची दखल ती संस्थाच घेते आणि सुरवातीपासूनच विचारांनी पोसणार्या त्या नारायणालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी घडतेय म्हणून त्या सामान्य माणसाची ओळख “आदर्श कार्यकर्ता” अशी गौरविली जाते…!
असा हा प्रवास जेंव्हा साहित्य क्षेत्रातील एका चळवळीत जीव ओतलेल्या अनिरुद्ध आचरेकर या व्यक्तिचाही आहे…!
कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्गचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ अनिरुद्ध लक्ष्मण आचरेकर यांना जाहीर झाला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे सचिव असणार्या अनिरुद्ध आचरेकर यांना तरुण वयात शाळेत लिपीक म्हणून काम करता करता साहित्याची गोडी लागली. को.म.सा.प.चे सच्चे जाणकार व अध्यक्ष साहित्यिक श्री.सुरेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाद्वारा संस्थेशी मालवण शाखा सचिव म्हणून जोडले जाणे आणि भरीव योगदान देताना ‘आदर्श कार्यकर्ता’ म्हणून सन्मानित होणे याविषयी अनिरुद्ध आचरेकर याचे श्रेय त्यांचे आवडते कवी नारायण सुर्वे, मार्गदर्शक सुरेश ठाकूर आणि कोमसाप संस्थेला देतात हे खरेच विशेष उल्लेखनीय आहे. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात रविवारी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासद स्नेहमेळाव्यात त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार जेष्ठ कवी आनंद वैद्य, मालवणी कवी रुजारिओ पिंटो, जेष्ठ साहित्यिका, कादंबरीकार वृंदा कांबळी यांना प्रदान करण्यात आला होता. श्री . आचरेकर यांनी मालवण तालुका को.म.सा.प.चे सचिव पदाच्या आपल्या कारकिर्दीत झपुर्झा या को.म.सा.प. मासिकाचे ५० आजीव सभासद केले. को.म.सा.प. चे १७५ आजीव सभासद केले. तसेच त्यांनी सन १८ – १९ ते २०-२१ पर्यंतचे सर्व ऑडिट रिपोर्ट प्रथम दिले आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन विविध ३३ कार्यक्रम घेऊन उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यांच्या सर्व कार्याचा विचार करून को. म.सा. प निवड समिती सदस्य तथा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, रुजारिओ पिंटो, भरत गावडे, विठ्ठल कदम, सौ. वृंदा कांबळी, सुरेश ठाकूर यांनी एकमताने को. म.सा.प आदर्श कार्यकर्ता परस्करासाठी निवड केली आहे.
अनिरुद्ध आचरेकर यांना साहित्याची आवड ते हा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार ही अचाट कामगिरी केवळ तीन वर्षांत परंतु नकळत घडलेली असल्याने त्यांची मालवण, आचरा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्याशी निगडीत सर्वच स्तरांतून प्रशंसा होत आहे.
कार्यकर्त्यांच्या अथक तळमळीशी जोडला गेलेला ‘सतरंजी’ हा शब्द अक्षरशः ‘सत्वरंगी’ बनवण्याची कामगिरी करुन अनिरुद्ध यांनी सामाजिक क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहेच..!
अभिनंदन आचरेकर साहेब