मालवण | ब्यूरो न्यूज : स . का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त “AI for Future, Inspirations from Past: Swami Vivekananda’s Legacy” या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. आयक्यूएसी, अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र, वाणिज्य विभाग, Nss विभाग, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला.
या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून सीएस टेक एआयचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत कामत आणि रामकृष्ण मिशन, गोवा चे प्रमुख स्वामी आर्यनंद महाराज उपस्थित होते. तसेच डॉ. शशिकांत झांट्ये, डॉ. अविनाश झांट्ये, डॉ. शिल्पा झांट्ये, ॲड. समीर गवाणकर, श्री. चंद्रशेखर कुशे आणि श्री. विजय केनवडेकर, प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर म्हणून उपस्थित होते.
परिसंवादाचे उद्घाटन स्वामी आर्यानंद, श्री. प्रशांत कामत तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
परिसंवादाच्या प्रथम सत्रात श्री. प्रशांत कामत यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) इतिहास, विकास, सद्यस्थिती आणि भविष्यातील शक्यता यावर सखोल विवेचन केले. त्यांनी एआयच्या फायद्यांबरोबरच त्याच्या धोक्यांबाबत देखील चर्चा केली. ते म्हणाले, “एआय चांगले की वाईट हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर तो समाजासाठी वरदान ठरू शकतो, पण त्याचा गैरवापर झाला तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात.”
परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात स्वामी आर्यानंद महाराज यांनी स्वामी विवेकानंदांच्या शिकवणींवर विविध घटना आणि उदाहरणे देऊन भाष्य केले. ते म्हणाले, “तुमचे भविष्य तुम्ही स्वतः घडवू शकता. संकटे आली तरी त्यावर उपाय शोधता येतो. प्रत्येक माणसामध्ये अमर्याद शक्यता आहेत. मोठे व्हायचे असेल तर मेहनत करावी लागेल. मनावर नियंत्रण मिळवले तर तुम्ही तुमचे सर्वोत्तम मित्र आहात, पण मन जर तुमच्यावर नियंत्रण ठेवत असेल तर तेच तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकते.”
स .का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित हा परिसंवाद विदयार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान यांचा संगम साधणारा हा परिसंवाद ज्ञानवर्धक ठरला. यावेळी उद्घाटन सत्रात महाविद्यालयाच्या वतीने मान्यवर अतिथींचा सत्कार करण्यात आला.
परिसंवादाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. मल्लेश खोत यांनी केले. डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रमुख अतिथी मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन डॉ. देविदास हारगिले यांनी तर सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले. समारोपाच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आयक्यूएसी विभाग, अर्थशास्त्र , व्यावसायिक अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग, Nss, तसेच आजीवन अध्ययन शिक्षण आणि विस्तार विभागाचा सहभाग होता.