शहर विकास आढावा बैठकीत आमदार निलेश राणे यांच्या नगरपरीषद प्रशासनाला स्पष्ट सूचना.
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची त्यांच्या कार्यकालातील, मालवण नगरपरिषद सभागृहात पहिली शहर विकास आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी शहर विकासाच्या बाबतीत प्रशासनातील प्रत्येकाने अत्यंत काटेकोर जबाबदारीने काम करायच्या स्पष्ट सूचना दिल्या. शहरविकासासाठी अधिकारी वर्गाकडून तथा प्रत्येक विभागाकडून जे जे चांगले आहे ते करताना पारदर्शकता व प्रामाणिकपणा अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. मागील दहा वर्षात जे काय झालं आहे त्यावर चर्चा करायला आपण इथे आलेलो नसून यापुढील उपाय व त्यासंदर्भात उत्तम नियोजन करणे महत्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी निर्देश दिले.
या आढावा बैठकीला आमदार निलेश राणे यांच्यासह नगरपरीषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक पंकज सादये, उमेश नेरुरकर, राजा गांवकर, बबन शिंदे, किसन मांजरेकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, ललित चव्हाण, नारायण लुडबे, राजू बिडये, राकेश सावंत, सोनाली पाटकर, संतोष साटविलकर, संदीप मालंडकर, किशोर खानोलकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार निलेश राणे यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह शहरातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली. यादरम्यान रखडलेले विकासप्रकल्प, स्वच्छता मोहिम, नळपाणी योजना, स्ट्रीटलाईट, कर विभागणी, सीआरझेड, शहर विकास आराखडा अशा विषयांवर पालिकेची परिस्थिती आणि शासनाकडून आवश्यक असणारे पाठबळ यावर सविस्तरपणे चर्चा केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवर यांनी सांगितले की
विकासकामे व इतर कामकाजाची नियोजनाचा अभाव असल्याने शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या. तसेच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी सांगितले की जास्तीत – जास्त प्रस्ताव सादर करून शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासाठी आमदार निलेश राणे प्रयत्न करणार असल्याने प्रशासनानेही यासाठी योग्य प्रकारे पाठपुरावा करावा. यावेळी बाबा मोंडकर म्हणाले की बचतगटांच्या विकासाच्या दृष्टीने मार्केट उभे करण्यासाठी पालिकेने सक्रीय पुढाकार घ्यावा.
यादरम्यान आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केली की अधिवेशनाच्या अगोदर अशाच आढावा बैठका घेण्यात येतील केले. शहरातील नळपाणी योजनेच्या कामाला ऑक्टोबरमध्ये वर्कऑर्डर दिल्यानंतर जर काही अडचणी तांत्रिक म्हणून त्याच्यात होत्या. त्यावर आपण तात्काळ मार्ग काढण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यावर मुख्याधिकारी यांनी आजच आम्ही ठेकेदारांना सांगणार आहोत असे सांगितले आहे. त्यामुळे उद्यापासून ते काम सुरू होईल. शहरवासियांसाठी शासनाने ३८ कोटींची नळपाणी योजना मंजूर केली आहे. यामुळे हा प्रश्न आज निकाली निघाला आहे, असेही श्री. राणे म्हणाले. तसेच सीरआरझेड संदर्भात काही समस्येसाठी पाच लाख रूपयांचा खर्च अपेक्षित होता, तोही खर्च श्री. राणे यांनी आपण स्वतः देत असल्याचे सांगत प्रश्न निकाली काढला. शहरात दर चार वर्षांनी करण्यात येणारी कर वाढ ही केलीच पाहिजे असे नाही तर शहरातील जनतेला आवश्यक सुविधा निर्माण करताना पालिकेने स्वतःचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कर वाढ करणे म्हणजे मार्ग काढणे नाही तर नगरपरीषदेने स्वतः सक्षम बनण्यासाठी किमान दहा ते पंधरा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आमदार निलेश राणे यांनी दिले.
शहरातील वाहतुकीची कोंडी यावर रिंग रोडची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी आपली चर्चा सुरू आहे. एक परिपूर्ण आराखडा तयार झाल्यानंतर शहरातील नागरिक, तसेच देवबाग, तारकर्ली, वायरी येथील जनतेच्या फायद्याचे रस्ते रिंग रोडच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहेत. यात कोणालाही विस्थापित न करता कामे केली जाणार आहेत. मात्र त्यापुर्वी आराखडा बनविण्यात येणार आहेत. शहराला रिंग रोड आणि बाहेरून कनेक्टिव्हिटी आपल्याला गरजेची आहे. गेल्या १० वर्षात यावर काहीच काम झालेनाही, असेही श्री. राणे म्हणाले.शहराला नगरोत्थान योजनेतून किमान ७५ कोटी रूपयांचा निधी विकासकामांसाठी दरवर्षी उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत व माजी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. तुम्ही शहराच्यादृष्टीने आवश्यक असणारे परिपूर्ण प्रस्ताव द्यावा . निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे, असेही त्यांनी सांगितले. शहरातील कचरा समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी फॅक्टरी याठिकाणी निर्माण होणे गरजेची आहे. कचरा उठविण्यासाठी कामगार वाढवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची सूचना त्यांनी दिल्या.
नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांच्या पहिल्या शहर विकासाच्या आढावा बैठकीत त्यांनी प्रत्येक विभागाकडून माहिती घेताना समस्यांवर तत्काळ उपाय व कामांची कार्यवाही या बाबींवर नगरपरीषद मुख्याधिकारी व इतर विभागीय अधिकारी यांना अधिक व व्यापक सक्रीयता दाखवली तरच नियोजनबद्ध विकास शक्य आहे व तो करुन घेण्यासाठी आपण सर्वजण जनतेशी कटीबद्ध आहोत हे स्पष्ट केले. माझ्या सहीत सर्वांनी जनतेला न्याय दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यासोबतच मुख्याधिकारी संतोष जिरगे व टीमने काही चांगली कामे देखिल केलेली आहेत पण आता विकासकामांच्या कार्यवाहीचा स्तर उंचावावा लागेल असे सांगताना यापुढे प्रशासन अधिक प्रगल्भ नियोजनबद्धता व समन्वय राखत शहराच्या विकासासाठी प्रशासन कसे काम करणार आहे याकडे बारकाईने लक्ष रहाणार आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.