शिरगांव / संतोष साळसकर / (विशेष वृत्त):
“पांडुरंगाची भक्ती थोर…धन्य धन्य तो गोरा कुंभार…जय विठ्ठले..हरी विठ्ठले…”, च्या जयघोषात देवगड तालुक्यातील चाफेड-गावठण येथील श्री गांगेश्वर मंदिरात अखंड हरिनामाचा सप्ताह नुकताच संपन्न झाला.यावेळी दशक्रोशीतील असंख्य भजनी मेळे, दिंड्या आल्या होत्या.संपूर्ण चाफेड गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेला.
सकाळी पुरोहितांकरवी पूजन करून मंत्रोपचाराने हरिनाम सप्ताहाची सुरवात करण्यात आली.दिवसभर लहानथोर चाफेडवासी मंडळी भजनामध्ये मग्न होते.रात्रौ ९ वाजल्यापासून चाफेड दशक्रोशीतील अनेक नामवंत भजनी मेळे, दिंड्या आल्या होत्या.यात बागमळा येथील दोन,किर्लोस,नारिंग्रे,खुडी,कुवळे,वळीवंडे, तोरसोळे, नाद आदि गावातून भजनी मेळे आले होते. या सर्वांची उठबस श्री गांगेश्वर -रासाई देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी केली.यावेळी असंख्य भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी संपूर्ण मंदिराला तसेच देवालयापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या दिंडीत आणि उत्सवात सहभागी असणार्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर “हरिनाम गर्जता…नाही भय चिंता..ऐसे बोले गीता…भागवत..”, या पंक्तिंचीच प्रचिती आलेले भाव दिसत होते.