लायन्स क्लब ऑफ मालवण यांचे विशेष सहकार्य.
मालवण | ब्यूरो न्यूज : नाशिक येथील द ब्लाइंड वेल फेअर ऑर्गनायझेशन इंडियाच्या अंध बांधवांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. यादरम्यान दिलेल्या प्रतिक्रियेत अंध बांधवांनी सांगितले की, सिंधुदुर्ग किल्ल्यात आम्ही बोटीने जात असताना समुद्राच्या लाटा काय असतात, याचा थरार आम्ही अनुभवला. सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्यता आम्ही आमच्या मनात साठवली. गाईडच्या मार्गदर्शन व सिक्थ सेन्सच्या सहाय्याने ही भव्यता आम्हाला अनुभवता आली.
नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर येथील द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर, सचिव दत्तात्रय पाटील यांसह ६० हून अधिक अंध सदस्य आपल्या परिवारासह मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आले होते.
द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या या प्रवासात मालवण येथील लायन्स क्लबचे विशेष सहकार्य लाभले. अंध बांधव आणि त्यांच्या परिवाराच्या राहण्या जेवणापासून अन्य सुविधांसाठी लायन्स क्लब ऑफ मालवणने मदत केली. क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी, मुकेश बावकर, अरविंद ओटवणेकर, मिताली मोंडकर, राधिका मोंडकर, वैशाली शंकरदास, उदय घाटवळ, उमेश शिरोडकर, विराज आचरेकर, अनुष्का चव्हाण, दिशा गावकर, मनाली गावकर हे यावेळी उपस्थित होते.