ज्येष्ठांच्या वतीने दिवाळी निमित्त परंपरा जनतासाठीचा विशेष उपक्रम.
तळेरे | निकेत पावसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी तथा ज्येष्ठांनी शालेय मुलांसाठी, दिवाळी निमित्त शुभेच्छा म्हणून पारंपारिक उटणे बनवून भेट म्हणून मोफत वाटप केले. दिविजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी हे उटणे तालुक्यातील सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले.
युवा पिढीला उटणे, कारेटे, पणत्या, रांगोळ्या या पारंपारिक गोष्टींचा विसर पडू नये वआपली संस्कृती काय आहे हे जाणून देण्यासाठी दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी विद्यार्थ्यांना मोफत उटणे वाटण्याचा उपक्रम राबवला. कणकवली तालुक्यातील कणकवली कॉलेज कणकवली, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली, एसएम हायस्कूल कणकवली, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल जाणवली, कळसुली कॉलेज, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे, कासार्डे माध्यमिक विद्यालय, वारगांव प्राथमिक शाळा नं १, वारगांव प्राथमिक शाळा नं ३, शेठ. न. म विद्यालय खारेपाटण या शाळेतील विद्यार्थ्यांना उटणे वाटप करण्यात आले.