कायमस्वरुपी बसफेरी सुरू न झाल्यास आंदोलन.
मसुरे | प्रतिनिधी : पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या आदेशानंतर विभाग नियंत्रक श्री अभिजीत पाटील यांनी देवगड – आंगणेवाडी – मालवण व्हाया – आचरे – त्रिंबक – मसुरे – बांदिवडे – आंगणेवाडी मालवण ही बसफेरी सुरू केली . परंतु देवगड एसटी डेपो मॅनेजर यांनी ही बसफेरी काही दिवसातच बंद केली. पुन्हा एकदा आंगणेवाडी विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन व प्रत्यक्ष भेट घेऊन सदरची एसटी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असता एसटी विजयदुर्ग – आंगणेवाडी अशी बफसफेरी सुरू केली गेली. परंतु सद्यस्थितीत ही गाडी कधी येते कधी येत नाही हे कोणालाच कळत नाही. काही वेळेला ही एसटी दुसऱ्याच मार्गाने जाते. त्यामुळे प्रवासी, ग्रामस्थ , आंगणेवाडी येथील भराडी देवी भक्तांच्या भाविकांचे अतोनात हाल होत आहेत काही वेळा ही एसटी नियोजित बस थांब्यांवरही थांबत नाही असा अशाही तक्रारी आहेत.
महाराष्ट्रामध्ये आंगणेवाडी येथे श्रीदेवी भराडी देवी मातेचे प्रसिद्ध असे मंदिर असून दरदिवशी हजारो भाविक या मंदिराला भेट देत असतात आणि म्हणूनच या एसटीची मागणी भराडी मातेच्या भक्तांमधून आणि ग्रामस्थांमधून होत होती. येथील प्रसिद्ध यात्रा उत्सवामध्ये एसटी महामंडळाला येथील ग्रामस्थ आणि मंडळ आपल्या जागा विना मोबदल्या उपलब्ध करून नेहमी सहकार्य करत असतात. परंतु देवगड एसटी आगार आणि संबंधित सर्व एसटी अधिकारी वर्गाच्या गलथान कारभारामुळे सदरची एसटी अनियमित तर कधी कधी येतच नसल्यामुळे आंगणेवाडी वरती हा एक प्रकारचा अन्याय असून सदर एसटी कायमस्वरूपी न केल्यास येथील ग्रामस्थ आंदोलन छेडणार असून याबाबत पुन्हा एकदा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधणार आहेत अशी माहिती आंगणेवाडी येथील ग्रामस्थ सिताराम उर्फ बाळा आंगणे यांनी दिली.