ब्युरो न्यूज : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात प्रवेश केला आहे. जडेजा आता भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाने याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. जाडेजाची पत्नी जामनगरमधून भाजपच्या आमदार आहेत. आता जडेजा सुद्धा भाजपचा सदस्य झाल्याने दोघेही भाजपसाठी काम करताना पाहायला मिळू शकतात. जडेजाने अलीकडेच टी ट्वेंटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे.
रिवाबाने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून जडेजाच्या भाजप प्रवेशाबद्दल माहिती दिली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा एक जुना फोटो सुद्धा तिने ट्विट केला आहे. रवींद्र जडेजा अनेकदा पत्नी रिवाबासोबत निवडणुकीच्या प्रचारात दिसला आहे. दोघांनी मिळून गुजरात मध्ये अनेक रोड शो देखील केले आहेत. आता जडेजा भाजपाच सदस्य झाल्याने पक्षासाठी दोघेंही आणखी वेळ देतील असं वाटतंय. तसेच जडेजाची एकूण लोकप्रियता बघता गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा याचा फायदा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी जडेजा फक्त भाजपचा सदस्य झाला आहे, आता आगामी काळात त्याच्यावर पक्षाकडून कोणती नवीन जबाबदारी सोपवण्यात येतेय का ते सुद्धा पाहाणं महत्वाचे ठरणार असल्याची प्रतिक्रिया जाडेजाच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.