मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं सत्ताधाऱ्यांवर मोठी नामुष्की ओढवली आहे. या प्रकरणावरुन राज्यभर मोठा संताप व्यक्त करण्यात येत असतानाच गुरुवारी (29 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेप्रकरणी जनतेची जाहीर माफी मागितली आहे.
नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना 26 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनंतर राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. तसंच याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. असं असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागितली आहे. ते पालघरमध्ये बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (30 ऑगस्ट) वाढवण इथल्या बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यानंतर सभेला संबोधित करत असताना मोदी यांनी मालवणमधील घटनेवरुन माफी मागितली. ते म्हणाले की, “2013 ला जेव्हा भारतीय जनता पक्षाने मला प्रधानमंत्री उमेदवार म्हणून निश्चित केलं तेव्हा सर्वात अगोदर मी रायगडच्या किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली होती. एक भक्त ज्या पद्धतीने भक्ती भावाने प्रार्थना करतो तसा मी राष्ट्रसेवेच्या कामाचा प्रारंभ केला होता. सिंधुदुर्गमध्ये जे काही झालं ते माझ्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही आहे तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे राजा, महाराजा, राजपुरुष मात्र नाहीत. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत. आज मी माझी मान झुकवून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो.”आमच्यासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. आम्ही तसे नाही आहोत जे सावरकरांना शिव्या देतात. त्यांची माफी मागत नाही. न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. हे सर्व करून त्यांना पश्चाताप होत नाही. आज इथे आल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांची क्षमा मागत आहे. तसेच या प्रकारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या जनतेची सुद्धा माफी मागतो.