गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी केले मार्गदर्शन.
मालवण | प्रतिनिधी : शासनाच्या शिक्षक भरतीतून मालवण तालुक्यातील नवनियुक्त ८८ शिक्षकांचे स्वागत आणि मार्गदर्शन कार्यशाळा मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग रघुनाथ देसाई सभागृह येथे संपन्न झाली. नवनियुक्त शिक्षकांचा शालार्थ आयडी जनरेट करणे तसेच सेवापुस्तकात नोंद करण्यात आली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिक्षकी पेशाला समाजात फार मोठे स्थान आहे. शिक्षण व संस्कारातून विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांनी आदर्श सेवाकार्यातुन नावलौकिक प्राप्त करावा. असे प्रतिपादन मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी केले
यावेळी तंत्रस्नेही शिक्षक भागवत अवचार, कृष्णा कालकुंद्रीकर, राजेंद्रप्रसाद गाड, विनीत देशपांडे, नवनाथ भोळे, दिनकर शिवलकर, गुरुनाथ ताम्हणकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी नार्वेकर यांनी केले. मालवण तालुक्यातील जिल्हापरिषद शाळेत एकूण नविन ८८ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. यात उपशिक्षक मराठी ६३, उपशिक्षक उर्दू १, पदवीधर भाषा १२, पदवीधर विज्ञान १२ असे शिक्षक नियुक्त झाले आहेत. या सर्वांचे स्वागत यावेळी गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले.
गेल्या काही वर्षात रिक्त शिक्षक पदांमुळे अनेक अडचणी होत्या. मात्र आता बहुतांश शिक्षक प्राप्त झाले आहेत. या माध्यमातून दर्जेदार शिक्षण विद्यार्थी वर्गाला देत असताना स्पर्धात्मक युगात टिकणारे विध्यार्थी निर्माण व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी शिक्षण विभाग विशेष प्रयत्नशील असल्याचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी सांगितले.