विशेष संपादकीय : अभिनेते विजय पाटकर हे त्यांच्या, ‘माझी पहिली चोरी’ या पहिल्याच नाटकापासून अत्यंत बोलका अभिनेता म्हणून ओळखले जातात. १९८८सालच्या ‘तेज़ाब’ सिनेमा पाह्यल्यानंतर तर त्यांची ओळख ‘प्रेक्षकांना एक सदैव प्रसन्न कलाकार’ अशी कोरली गेली. काॅमेडी किंग किंवा विनोदवीर ही दोन्ही बिरुदे त्यांच्या अभिनय प्रवासामध्ये त्यांच्या सोबत अखंड आहेतच परंतु त्या बिरुदांसोबत, माणुस म्हणून जगताना पहावे लागलेले चढ उतार, विजय पाटकर यांनी अत्यंत गंभीरपणे हाताळले….!
“त्यांच्या अभिनयावर चार्ली चॅप्लिन यांचा प्रभाव असल्याचे जाणवतो” हे त्यांच्या अभिनयाला मिळालेले ऑस्कर म्हणता येईल. परंतु तो अभिनय करता यावा यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा माहौल शिकून सिनेमा व नाटक आत्मसात केलेला ज्येष्ठ सिने – नाट्य कलावंत अशीही त्यांची ओळख आहे.
त्यांची मराठी व हिंदी सिनेमांची यादी खूप मोठी आहे आणि त्यांच्या नाटकांच्या प्रयोगांचीही संख्या प्रचंड आहे परंतु त्यांनी स्वतःसोबत अनेकांना अभिनय क्षेत्रातील प्रत्येक बारकाव्याकडे अत्यंत गंभीरपणे पहायला शिकवले हे अत्यंत महत्वाचे आहे. अभिनय क्षेत्रातील गरजू, होतकरू आणि प्रस्थापित असे सर्वच एकत्र आणण्याची किमया त्यांनी विविध उपक्रमांमधून साध्य केलेली आहे. अभिनय किंवा सिनेमा नाटक ही जर आपली ‘रोजी रोटी’ असेल तर त्यातील सातत्य व प्रामाणिकपणा यामध्ये तडजोड न करता या क्षेत्रात कार्यरत रहावे लागते हे त्यांनी जाणले व स्वतः तसा वास्तुपाठ घालून दिला. निव्वळ बोभाटा न करता आणि स्वत बद्दल न बोलता त्यांनी अनेक तंत्रज्ञ, अभिनेते यांना प्रकल्प मिळवून दिले आहेत असे त्यांना ओळखणारे नेहमी सांगतात. एखाद्या चांगल्या उद्देशासाठी त्यांनी दिलेल्या हाकेला अनेक व्यस्त सेलिब्रेटिज तत्काळ प्रतिसाद देतात, यावरुन ते सिनेमा व नाटक क्षेत्रातील लोकांसाठी किती झटलेले आहेत याचा अंदाज येतो..! केवळ आपल्या भविष्य निर्वाहासाठीच नाही तर कलेच्या वसा व वारसा यांसाठी कला क्षेत्रातील माणसांना सुसंघटीत करणे हा त्यांचा उद्देश असतो. अभिनय व शब्द संवाद या पलिकडेही ते कार्यरत असतात.
माणुस म्हणून कलेच्या क्षेत्रात ‘काय गाळावं आणि काय निवडावं’ याची जाण असलेल्या श्री विजय पाटकर यांचा आज २९ मे रोजी वाढदिवस आहे. झटपट, नेमकी आणि परिणामकारक संवाद फेक किंवा कधी कधी तर ‘न बोलताही’ अख्खा संवाद प्रेक्षकांपर्यंत अत्यंत सहज पोहोचवारा अभिनेता विजय पाटकर यांच्या विविध प्रकल्प व उपक्रमांची प्रतिक्षा प्रेक्षक व कलाकार यांना नेहमीच असते आणि ती पूर्ण होतही असते….व होतच राहो अशाच सदिच्छा…!
सुयोग पंडित ( मुख्य संपादक, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल )