मालवण | संपादकीय विशेष : अवघ्या भारतवर्षाला एकत्र येत रोशन करु शकणारा सण म्हणजे दिवाळी.
यावर्षीची दिवाळी ही अक्षरशः लहान मुलांच्या अप्रुपाची जितकी आहे तितकीच प्रत्येक भारतीयालाही हवीहवीशीच अशी आहे कारण गेल्यावर्षीपेक्षा यावर्षीचे सामाजिक आरोग्याचे नियम थोडे शिथील झाले आहेत.
एकत्र येणे ही एक मानवी संस्कृतीच आहे. जेंव्हा लाॅकडाऊन हा उपचार सामान्य भारतीयांना अंगवळणी पडला नव्हता तेंव्हा कायदा, शासन वगैरेचा बड़गा लोकांनीही आपापल्या क्षेत्रात व परिसरांत जरुर अनुभवला. लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर एकत्र येण्याचे,छोट्या छोट्या आनंदांचे,रक्तापलिकडील व रक्तातील नात्यांचेही अप्रूप बहुतांश समाजशील सूज्ञ जाणत गेले.
आज दिवाळी दिल खोलून साजरी केली जायची तयारी होतेय.
कोरोनानंतरही निराश करणार्या, खचवणार्या आणि उद्विग्न करणार्या घटनाही घडल्यात.
कला,शिक्षण, आरोग्य,राजकारण वगैरे सर्वच क्षेत्रातील खल व सत्ववृत्ती समाजासमोर मोठ्या प्रभावशालीपणे यायलाही सुरवात झाली आहे. दोषारोप,समस्या यांपेक्षा निराकरणावर विचार होऊ लागले आहेत.
जागतिक व राष्ट्रीय स्तरावर हे सगळे घडताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलही अनेक ठळक व पुसट घडामोडीही आपण आपल्या आपली सिंधुनगरी चॅनेलद्वारा जाणून प्रेक्षकापर्यंत पोहोचवायचा पुरेपूर प्रयत्न केला आहे व करत राहू.
मुद्दाम काही नांवे अधोरेखीत कराविशी वाटतात. पत्रकारितेच्या अलिखित शिष्टाचारामध्ये कदाचित व्यक्तीविशेषाचे कौतुक करणे हे नीतीला धरुन नसेल किंवा सामाजिक बाजुने पहाताना ते लांगुलचालनही वाटू शकेल परंतु जिल्हास्तरावर काही व्यक्तिमत्व त्यांच्याकडील मर्यादीत अधिकार व साधनांमध्येही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीविशेषांची दखल घेत ती समाजापर्यंत पोहोचवली नाही तर पत्रकारिताही विनाकारण आसूड बनून चालवायचे हत्यार नाही हा संदेशही पत्रकारीता उत्सुक समाजघटकाला पोहोचवावा हाही चॅनेलचा प्रामाणिक प्रयत्न राहीलच.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्र व खासकरुन ग्रामीण भागातील शिक्षकवर्गाचे खरेच विशेष कौतुक कारण त्यांनी नेटवर्क व इतर तांत्रिक समस्यांशी झगडत अध्यापनाचे काम अखंड ठेवले.
तसेच आरोग्य सेवेतील विविध स्तरांवर अतिशय व्यावसायिक व समजंस सेवा बजावली गेली.
एस.टी. व टपाल कर्मचारी यांनी खूप आर्थिक ताण सहन करत त्यांची कुटुंबं चालवली. खाजगी दळणवळण व रुग्णवाहिका सेवांनी अनेक अत्यावश्यक कार्य जीव धोक्यात घालून पूर्णत्वास नेली.
आधीच हतबल असलेला शेतकरी वर्गही जमिनीत जोमाची बिजं पेरत राहीला. अनेक साहित्यिक, कलाकार व सांस्कृतिक सेवक त्यांच्यातील यथाशक्ती प्रतिभेने समाजाचे मनोरंजन, जनजागरण व चैतन्य टिकविण्याचे कार्य करत राहीले….काहींनी खूप जास्त केले तरी ते लोकांचे मनोरंजन करणारेच ठरले.
मैदानी खेळाडूंची तर खरेच वेगळी व्यथा होती. खेळासोबत व्यायामशाळेचे उपासकही खूप घुसमटत होते…त्यांनीही विविध प्रकारे इतरांना आरोग्यासाठी प्रेरित केले.
पत्रकार हा घटक तसा कुठल्याच थेट व ठोस दृष्य निर्मितीत नसतो परंतु प्रत्येक निर्मितीचा धागा जो तो पाहू शकतो व दाखवू शकतो तो कदाचित त्या निर्मितीच्या निर्मात्यालाही दिसलेला नसतो .जिल्ह्यातील सालस पत्रकार त्यांची कामावरील निष्ठा अबाधित राखत जगले. केशकर्तनालय, सोनारकाम, कुंभारकाम,हाॅटेल व्यवसाय,रिक्शासेवा व इतर कौशल्यगीरही खूप कष्टात जगले…..पण तरले..!
कारण जिल्हा नविन युग पहायला…नवीन दिवाळी साजरी करायला खरेच दिल खोलके तयार आहे.
दिवाळी हे एक प्रकाशाचे नवीन पान ठरेल. ज्या पानावर दोषारोष, सबबी आणि तक्रारीची शाई उमटणारच नाही इतका लख्खपणा ही दिवाळी आणेलच ही आशा.
संपूर्ण आपली सिंधुनगरी समूहातर्फे,संचालकांतर्फे व प्रतिनिधी तथा वार्ताहरांतर्फे सर्वांना दिवाळीच्या दिलखोलकेपणाच्या शुभेच्छा.
सुयोग पंडित. (संस्थापक/मुख्य संपादक, आपली सिंधुनगरी चॅनेल)
माझी सिंधुवाहीनी परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर, संपादकीय लेख अप्रतिमच.